माजी आ. धोंडे म्हणाले, लॉकडाऊनला विरोध चुकीचा
आष्टी दि.26 ( प्रतिनिधी ) कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असून लॉकडाऊनला विरोध करणे चुकीचे असल्याचे भाजपचे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.दरम्यान आज सकाळी भाजप आ. सुरेश धस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बंद दुकाने उघडण्यास सांगितले व लोकांनी प्रतिसाद देत दुकाने उघडली त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
माजी आ. धोंडे म्हणाले, विरोधाला विरोध करणे चुकीचे आहे. कोरोना रोगातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून आज रोजी मृत्यू दर वाढला आहे. आष्टीतील काही व्यापाऱ्यांचा मृत्यू देखील कोरोनामुळे झाला आहे. तालुक्यातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला विरोध न करता आपली दुकाने बंद ठेवावी. दुकान दहा दिवसांनी देखील चालू करता येते पण या आजारात एखादी व्यक्ती मृत्य झाली तर ती परत येत नाही असेही धोंडे म्हणाले. राजकारण्यांनी अशावेळी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगून धोंडे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप आ. सुरेश धस यांनाच विरोध करत त्यांच्या लॉकडाऊन विरोधी भूमीकेचा जोरदार विरोध केला. एकाच तालुक्यात एकाच पक्षाच्या नेत्यांची लॉकडाऊन संदर्भात दोन वेगवेगळी मते समोर आली आहेत.
Add new comment