लाइव न्यूज़
खजाना विहिर नामशेषेे होण्याच्या मार्गावर
Beed Citizen | Updated: July 15, 2018 - 3:25pm
बीड, (प्रतिनिधी):- ऐतिहासिक दृष्ट्या पुरातन विभागाच्या नोंदीमध्ये अनन्य साधारण: महत्व असाणार्या खजाना विहिर पुरातन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. खजाना विहिरीची देखभाल नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक विहिरीत केरकचरा टाकत घाण पसरवत असल्याने एकेकाळी शहराची तहान भागवणारी खजाना विहिर घाणीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे.
इ.स.१६२५ ते ३० या कालावधीमध्ये ही विहिर बीड शहरापासुन पाच किलोमीटर अंतरावर बांधण्यात आली. बीडचे मुळ नाव चंपावतीनगर असे होते. महंम्मदबीन तुघलक यांनी देवगिरीचा किल्ला सर केल्यानंतर हा भाग त्यांच्या अधिपत्याखाली आला. चंपावती नाव बदलून तुघलक यांनी भिर असे नाव बीडचे ठेवले. भिर या शब्दाचा अर्थ पारशी भाषेत पाणी असा होतो. म्हणजे हा प्रदेश पाण्याचा खजाना होता. खजाना विहिरीचा व्यास ५० फुट आहे तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासुन १७ फुटावर विहिर गोलाकार ओसंडी असुन सहा फुट विहिर आहे. या विहिरीत सहजपणे फिरता येते. गेल्या अनेक वर्षापासुन विहिरीचे पाणी आटले नसून एकेकाळी सिंचनाचा मोठा भाग या पाण्यामुळे व्यापला गेला होता. आज विहिरीची दुर्दशा झाली असुन विहिरीमध्ये प्लास्टिकच्या बॉटल केरकचरा मोठ्या प्रमाणात साचला असुन परिसरात कारखानेही उभे राहिले आहे. यामुळे विहिरीच्या मुळ सौंदर्याला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन विहिरीकडे जाणारा मार्गही रखडला आहे. पुरातन विभागाचे कार्यालय शहरात नसल्याने या ठिकाणी असणार्या पुरातन विभागाच्या खजाना विहिर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो. विहिरीमध्ये उर्दू भाषेत शिला लेख असुन विहिरीला तीन कालवे आहे. ही विहिर मलिक अंबरच्या काळात बांधली असल्याचाही अंदाज व्यक्त केला जातो. मध्ययुगीन काळात अशा विहिरींचा वापर पैसा किंवा धन ठेवण्यासाठीही केला गेला आहे. सध्याच्या पाणी टंचाईवर ही विहिर पर्याय उपलब्ध होऊ शकते. पर्यटक व इथे येणारे नागरिकांच्या गैरप्रकारामुळे विहिरीच्या सौंदर्याला मारक ठरत असुन केरकचरा विहिरीमध्ये टाकत खजाना विहिर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे प्रशासनाने व पुरातन विभागाने लक्ष देण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
Add new comment