लाइव न्यूज़
महिलेवर अत्याचार होवूनही प्रशासनाने ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल केला नाही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा आरोप
बीड, (प्रतिनिधी):- दिवसाकाठी १२ व महिलांवर अन्याय होत असल्याचा पोलिसांचाच अहवाल आहे. असे असतांनाही राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेप्रश्नी गंभीर नसल्याचे सांगून बीड जिल्ह्यात एका महिलेवर अत्याचार होवूनही प्रशासनाने त्या प्रकरणाशी संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केला. सदर पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असुन त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये चित्राताई वाघ बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष रेखाताई फड, सुरेखाताई क्षीरसागर, पठाण आदिंची उपस्थिती होती. यावेळी चित्राताई वाघ म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ३५ कायदे असुन देखील त्या सुरक्षित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यात एका महिलेवर अत्याचार झालेला असुन या प्रकरणात एका आमदाराचा समावेश आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आणि पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतरही प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आलेली असुन त्याचा पाठपुरावा केला जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्यात महिला सेफ्टी ऑडीट उपक्रम राबवणार
राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत आहेत. त्या पार्श्वभुमीवर राज्य हिंसामुक्त होण्यासाठी महिला सेफ्टी ऑडीट उपक्रम राबवणार असल्याचे चित्राताई वाघ यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात हे सेफ्टी ऑडीट राबवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्याशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील धोक्याची ठिकाणे सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. एखाद्या भागामध्ये अंधार किंवा अन्य अडथळा असेल तिथे पथदिवे बसवून अन्य अडथळेही दूर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Add new comment