सुरेश धस हुकमी एक्का; धनंजय मुंडेंना धक्का

बीड, (प्रतिनिधी):- तब्बल १८ दिवसापासुन लांबणीवर पडलेल्या बहुप्रतिक्षित बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल आज जाहीर झाला. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळेंचा ७४ मतांनी पराभव करत सत्तेच्या वलयात उडी घेतली आहे. १००४ मतांपैकी धस यांना ५२६ तर जगदाळेंना ४५२ मते पडली. तब्बल २५ मते अवैध ठरली असुन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक मतदार असलेल्या मतदारांचीच मते बाद ठरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान औपचारिक घोषणेनंतर सुरेश धस यांची उस्मानाबादेत विजयी मिरवणूक काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या विजयी रॅलीने उस्मानाबाद दणाणून गेले होते. बीडच्या गुलालात उस्मानाबादकर चिंब भिजल्याचे चित्र आज पहायला मिळाले. दरम्यान आजच्या विजयामुळे सुरेश धस हे पुन्हा एकदा हुकमी एक्का म्हणून समोर आले असुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. १००६ पैकी १००५ मतदान झाल्यानंतर  दि.२४ मे रोजी मतमोजणी होणार होती. मात्र बीड नगर पालिकेतील सदस्यांचे पात्र-अपात्रता प्रकरण  आणि स्वतंत्र मतासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेमुळे मतमोजणी न्यायप्रविष्ठ होती. तब्बल १८ दिवसानंतर आज उस्मानाबादेत मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासुनच भाजपचे उमेदवार सुरेश धस आघाडीवर होते. मध्यंतरी बाद मतांच्या प्रक्रियेमुळे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यामुळे मतमोजणी काही वेळ थांबवावी लागली होती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर मतमोजणी सुरु झाली. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना ५२६ तर राष्ट्रवादी पुरस्कृत जगदाळेंना ४५२ मते मिळाली. तब्बल २५ मते अवैध ठरली असुन एका मतदाराने नोटाचा वापर केला. सुरेश धस ७४ मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. सकाळपासुनच गुलाल घेऊन थांबलेल्या धस समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. औपचारिक घोषणेनंतर सुरेश धस यांची विजयी रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांनी धसांच्या नावाने घोषणाबाजी करत उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. आ.धस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भाजपचे चिन्ह असलेले झेंडे आणि गुलालांची उधळण करत धसांचा ‘धसका’ कसा असतो हे  कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. दरम्यान आजच्या निकालामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सुरेश धस पुन्हा एकदा हुकमी एक्का ठरले असुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.