लाइव न्यूज़
रुग्ण पळवा-पळवी प्रकरणातील महिलेचा मृत्यू
Beed Citizen | Updated: June 7, 2018 - 3:11pm
सीएस साहेब, आता तरी डॉ.मुंडेंविरुद्ध तक्रारीची दखल घेणार का?
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा रुग्णालयातील रुग्णाची पळवा-पळवी प्रकरणात किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या त्या महिलेचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान सदर महिलेवर अर्धवट डायलेसीस केल्याप्रकरणी डॉ.मनोज मुंडे यांच्याविरुद्ध महिलेच्या पतीने जिल्हा शल्यचिकित्सांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आतातरी सीएस साहेब, डॉ.मुंडे विरुद्ध तक्रारीची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात डायलेसीससाठी दाखल झालेल्या शेख बेबी शेख नसीर (रा.राजगल्ली, माजलगाव) या महिलेस तात्काळ डायलेसीस करण्याचा सल्ला देत डॉ.मनोज मुंडे यांनी स्वत:च्या खासगी रुग्णालयात नेवून त्याठिकाणी डायलेसीस केल्याचे शेख नसीर यांनी जिल्हा शल्यचिकित्साकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. डॉ.मुंडे यांनी नळ्या लावलेले आऊट झाल्यामुळे त्या महिलेचे दुसर्या दिवशी जिल्हा रुग्णालयातही डायलेसीस झाले नाही. डॉ.मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये डायलेसीसचे दहा हजार रुपये घेण्यात आले त्यामुळे अखेर पैसे नसल्याने जिल्हा रुग्णालयातही त्या महिलेवर डायलेसीस न झाल्याने महिलेला नातेवाईकांनी घरी नेले. अखेर काल सायंकाळच्या सुमारास शेख बेबी यांचा मृत्यू झाला. दरम्यान डॉ.मनोज मुंडेंविरुद्ध पतीने तक्रार करुनही शल्य चिकित्सकांनी अद्याप दखल घेतली नसुन डॉ.मुंडे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आमच्या पेशंटसोबत जे झाले ते अन्य दुसर्यांसोबत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत तात्काळ कारवाई करावी असे शेख नसीर यांनी म्हटले आहे.
Add new comment