लाइव न्यूज़
चांगलं काम करणार्या अधिकार्यांना शाबासकी ऐवजी चक्क नोटीस!
Beed Citizen | Updated: June 1, 2018 - 2:57pm
बाळाचे प्रकरण; डिवायएसपींनी बजावली पोनि. सय्यद यांना नोटीस
म्हणे, गोपनियता भंग झाली;
राज्याचे लक्ष लागून असलेल्या प्रकरणात माध्यमांना माहिती देणे चुकीचे आहे काय ?
बीड, (प्रतिनिधी): बाळाच्या प्रकरणात डीएनए अहवालाची माहिती देवून गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी शहर ठाण्याचे पो.नि. सय्यद सुलेमान यांना नोटीस बजावली आहे. राज्यात खळबळ उडवून देणार्या या प्रकरणाच्या अहवालात नेमके काय आहे? याकडे आरोग्य प्रशासनासह जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागलेे होते. अशा वेळी डीएनए अहवालाची माहिती माध्यमांना आणि त्यांच्या मार्फत जनतेला देणे, हे संबंधीत अधिकार्याचे कर्तव्य आहे. अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणात अवघ्या नऊ दिवसात तपास लावून एक घाव दोन तुकडे करणार्या आणि सत्य समोर आणणार्या अधिकार्यास शाबासकी ऐवजी चक्क नोटीस बजावणे म्हणजे, ‘एसपी साहब, यह बात कुछ हजम नही हूई’ अशाच प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयातील छाया थिटे यांनी जन्म दिलेल्या बाळाची अदलाबदली झाल्याच्या आरोपानंतर पोलिसांत नोंद झाली होती. शहर ठाण्याचे पो.नि. सय्यद सुलेमान यांनी सर्व तपास करूनही सत्यता समोर येत नसल्याने थिटे दाम्पत्यांसह बाळाच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. बुधवारी सायंकाळी रिझलन फॉरेन्सींक लायब्रोटरी औरंगाबाद येथील तज्ञ जे. पी. दिवटे यांनी पोलिस निरीक्षक बीड शहर यांच्या नावे डीएनए अहवाल बंद लिफाफ्यात पाठवला होता. सदरील अहवाल आल्याची माहिती पो.नि.सय्यद सुलेमान यांनी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, डीवायएसपी सुधीर खिरडकर , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना दिली होती. अहवालाची प्रतही त्यांना दाखवून सदरील प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली होती. माध्यमांनामुळे या प्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती जनतेसमोर आली. तब्बल नऊ दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तपासी अधिकारी म्हणून पो.नि. सय्यद सुलेमान यांनी केलेल्या कामगिरीचे आरोग्य प्रशासनासह खाजगी डॉक्टरांनी आणि सामान्य जनतेने ही कौतुक केले. पो. नि. सय्यद यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या प्रकरणाचा कसून तपास करत सत्य समोर आणल्यानेजिल्हा पोलिस दलाची मान ही उंचावली आहे. अशावेळी चांगल्या अधिकार्यांचे कौतुक करण्याऐवजी पोलिस उपअधिक्षक सुधीर खिरडकर यांनी पो.नि. सय्यद यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा दाखला देत चक्क नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेसह पोलिस कर्मचार्यांतूनही नाराजी व्यक्त दिसून येत आहे.
Add new comment