पोनि.सुरेश बुधवंत यांच्या टीमचा आगळा-वेगळा उपक्रम
बीड, (प्रतिनिधी):- रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने बीड वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नियोजन करुन आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पाच मिनिटे डोळ्यांसाठी हा उपक्रम राबवून रस्त्यावरील वाहन चालकांना थांबवून त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रस्ता सुरक्षा अभियानात आणि एरवीपण विविध निमित्ताने नेत्र चिकित्सा शिबीरे होत असतात सहसा या शिबीरांमध्ये एखाद्या दवाखान्यात शिबीरार्थींना बोलावणे जात. व जे स्वत:हून रुग्णालयात येतात त्यांचीच नेत्र तपासणी होते परंतु वाहन चालकाचे डोळे हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा अवयव असतात स्वत: त्याच्यासाठी व सार्वजनिक आरोग्यासाठी वाहन चालकाची नजर तिक्ष्ण व स्वच्छ असणे गरजेचे असते हे ध्यानात घेवून जिल्हा रुग्णालय बीड रोटरी क्लब बीड सिटी आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतुक निरिक्षक सुरेश बुधवंत यांच्या सूचनेनुसार पाच मिनिट डोळ्यासाठी या उपक्रमाचे नियोजन केले. या अंतर्गत वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी हायवेवर वाहन चालकांना थोडा वेळ थांबवून तेथेच ऑन द स्पॉट नेत्र तपासणी करुन घेतली. त्यासाठी जालना रोडवरील रेनॉल्ड शोरुम संजय तुपे, गौरव कुरवाडे, धर्मराज तळेकर, प्रविण करवा, विजयकुमार पंडित, गणेश जरांगे, कु.निकिता प्रभाळे यांनी आद्ययावत उपलब्ध करुन दिले. वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी दिवसभर उन्हात वाहन चालकांना थांबवून विनंती करुन त्यांचे डोळे तपासुन घेत होते. या शिबीराचे उदघाटन पोलिस उपनिरिक्षक बिरादार यांनी केले. यावेळी केशव मुंडे, वारभवन उपस्थित होते. नेत्र शल्य चिकित्सक डॉ.पाटील यांच्या नियोजनाखाली डॉ.निरगुडे व सय्यद हमीद यांनी वाहन चालकांची नेत्र तपासणी करुन आवश्यकतेनुसार नंबर काढून दिले व मोफत नेत्र तुषारचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब बीड सिटीचे अध्यक्ष विजय दुरुंडे, सचिव सचिन लातूरकर व रोटरीयन राजेश देशमुख या कामी अनमोल सहकार्य लाभले. जिल्हा पोलिस दलाच्या कल्पकतेतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Add new comment