गेवराईच्या मद्यधुंद पीएसआयचा हॉटेलमध्ये राडा

हॉटेलमध्येच फ्रीस्टाईल; मालकासह ग्राहकांवर रोखले पिस्तूल; स्थानिक पोलिस अधिकार्‍याच्या श्रीमुखातही लगावल्या
अहमदनगर, (प्रतिनिधी):- पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे तारखेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असताना गेवराई (जि.बीड) पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे यांनी मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालक, ग्राहक व पोलीस यांना रीव्हाल्हरचा धाक दाखवत राडा केला. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी मालुसरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पाथर्डी (जि.अहमदनगर) येथील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे काल गुरुवारी (दि.२६ एप्रिल) दुपारी एक वाजता बसला होता. दुपारपासून मालुसरे यांनी १९ बीअरच्या बाटल्या रिचवल्या. चांगली झिंग चढल्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधुबन येथे धिंगाणा घालायला सुरवात केली. यावेळी मालुसरे यांनी पोलीस असल्याने मोठ्या अविभार्वात समोर येईल त्या ग्राहकाला, वेटरला मद्यधुंद अवस्थेत फ्री स्टाईलने मारहाण करायला सुरवात केली. खाजगी चारचाकी वाहनात वर्दी काढून ठेवलेले पोलीस महाशयांनी लोकांना शिव्या देत ‘मी ड्युटीवर आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही’ असे बरळत हॉटेल मधील फर्निचर, टेबल, खुर्च्याची मोडतोड करायला सुरवात केली. त्यावेळी हॉटेलवर जेवण करायला आलेल्या एका युवकाला मालुसरे याने विनाकारण मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मित्र मंडळी बोलावून उपस्थित बघ्यांची गर्दीने मालुसरे यांना बेदम चोप दिला. यावेळी संबधित हॉटेल चालकाने भांडणे सोडवत असताना मालुसरे यांनी कमरेला असलेले पिस्तूल ग्राहक व हॉटेल चालकावर ताणले. त्यामुळे सर्वांची काही काळ पाचावर धारण बसली.
हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी प्रसंगावधान राखत पाथर्डी पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटना ठिकाणी दाखल झाले परंतु मालुसरे याने पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरवात केली. पोलीस कर्मचारी यांनी याबाबत वरीष्ठांना कल्पना दिली. तात्काळ पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर हे सहका-यासह घटनास्थळी दाखल झाले. मालुसरे यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले असता त्याने त्याच्याकडील सरकारी रिव्हॉलर टेबलवर आपटून फोडला. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या दोन श्रीमुखात भडकावल्या. उपस्थित गर्दी व पोलिसांनी मोठ्या हिकमतीने बेफाम पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यास ताब्यात घेतले.
घटनेचे चित्रीकरण हॉटेलच्या सीसीटीव्हीत झाले असून घटने बाबत हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमोल मालुसरे याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, शासकिय नोकराला मारहाण करणे, मालमत्तेची नुकसान करणे, हत्यारे अधिनियमाअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालुसरे यास पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित अधिकार्‍याविरुद्ध कारवाई होणारच-वैभव कलुबर्मे
पाथर्डी येथील एका हॉटेलमध्ये पोलिस उपनिरिक्षकाने गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बीड पोलिसांनीही सर्व माहिती मागवली असुन संबंधित पोलिस उपनिरिक्षकाविरुद्ध कारवाई होणार असल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.