धारुर येथे मोबाईल शॉपी फोडली; तीन लाख रुपयाचा माल लंपास
सहा महिन्यातील चोरीची चौथी घटना; धारुर पोलिसांची नामुष्की
धारुर, (प्रतिनिधी):- येथील शिवाजी चौका शेजारी असणारी सहारा मोबाईल शॉपी काल मध्यरात्री चोरट्यांनी फोडली असुन मोबाईलसह इतर सामान चोरट्यांनी लंपास केले आहे. सहा महिन्यातील चोरीची ही चौथी घटना असुन धारुर पोलिसांच्या नाका टिच्चून चोरटे धुडघूस घालण्याचा प्रकार करत असल्याचे दिसुन येत आहे. जवळपास या घटनेमध्ये चोरट्यांनी मागील चोरी प्रमाणेच सीसीटीव्हीची हार्डडिस्क चोरुन नेल्याने मागील चोरीतही या चोरट्यांचा हात असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिवाजी चौकातील सहारा मोबाईल शॉपी काल मध्यरात्री दिडच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फोडली आहे. मोबाईलसह रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली असुन ३ लाख रुपयांचा माल चोरीस गेल्याचे सांगण्यात आले आहे. सहारा मोबाईल शॉपीचे मालक सय्यद तौसिफ बाबामियॉ इनामदार यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागील सहा महिन्यातील चोरीच्या घटना घडल्यानंतर पुन्हा काल मध्यरात्री चोरट्यांनी अतिशय शिताफिने ही मोबाईल शॉपी फोडली आहे. जवळच असलेल्या शिवाजी चौकात पोलिस बंदोबस्त असतांना चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देत ही चोरी केली आहे. याआधी एक सोन्याचे दुकान, मोबाईल शॉपी आणि पान मटेरियल दुकानामध्ये चोरी झाली होती. दोन जागेवर झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांचे सिसिटीव्ही फुटेज मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
चोरट्यांना धारुर पोलिसांचा वचक राहिला नाही!
मागील वर्षभरामध्ये झालेल्या चोर्यांचे तपास सुरु असतांनाच चोर्यांचे सत्र सुरुच असल्याने चोरट्यांना धारुर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा ऐकवयास मिळत आहे. शिवाजी चौकाशेजारी पोलिस बंदोबस्त असतांना चोरट्यांना पोलिसांची कसलीच भिती नसल्याचे या चोरीच्या घटनेवरुन दिसुन आले. मागील चोर्या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असुन दोन चोरींच्या घटनांमध्ये चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज सापडूनही त्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Add new comment