लाइव न्यूज़
धारुरची कुंडलिका पाणी पुरवठा योजना लालफितीत अडकली
बिलाला अंतिम मंजुरी न मिळाल्याने २२ कोटीचे काम रखडले
धारुर, (प्रतिनिधी):- धारुरकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या कुंडलिका पाणी पुरवठा योजनेला २०१४ साली शासनाची मंजुरी मिळालेली आहे. सदर योजना १८ महिन्यात पुर्ण होणे अपेक्षित असतांना ४ वर्ष झाले तरीही योजना पुर्ण न झाल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त होत आहे. कुंडलिका पाणी पुरवठा योजनेवरुन वातावरण तापले असुन सोशल मिडीयावरुनही संताप व्यक्त होवू लागला आहे. दरम्यान नगराध्यक्षांनी बिलाला अंतिम मंजुरी न दिल्यामुळे काम बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
धारुर शहरातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याच्या उद्देशाने कुंडलिका धरणातून २०१४ साली आघाडी शासनाच्या काळात २२ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. ही योजना १८ महिन्यात पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ४ वर्ष उलटूनही ही योजना पुर्ण न झाल्याने धारुरवासियांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रश्नी वेळोवेळी आंदोलन आणि पाठपुरावा करुनही योजना पुर्ण न झाल्याने भर उन्हात धारुरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता नगराध्यक्षांकडून अंतिम बिलाला मंजुरी न मिळाल्यामुळे हे काम सध्या बंद असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सध्या कुंडलिका पाणीपुरवठा योजनेवरुन वातावरण तापले असुन योजना मंजुर होवूनही ती राबवता न आल्याने स्थानिक सत्ताधारी, प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होवू लागला आहे. सदरील योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने बिलाला तात्काळ अंतिम मंजुरी देवून पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मंजुरी मिळताच काम सुरु होईल-मुख्याधिकारी भोसले
प्रशासकीय पातळीवरुन सदरील योजनेसंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही पुर्ण झालेली आहे. बिलाला अंतिम मंजुरी मिळाली की बिले दिली जातील आणि पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
Add new comment