लाइव न्यूज़
जिल्हा उद्योग केंद्र वार्यावर; अनेकांची दांडी तर एक जण चक्क झोपेत!
बीड, (प्रतिनिधी):- येथील भाजीमंडई रस्त्यावरील जिल्हा उद्योग केंद्रात आज दुपारी सर्व खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. अधिकार्यांसह कर्मचार्यांनीही मारलेली दांडी अनेकांसाठी गैरसोयीची ठरली. बाहेरुन कलर काम सुरु असल्यामुळे एकही अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हता. एकाच कर्मचार्यावर अख्ख्या उद्योगकेंद्राची भिस्त होती. मात्र दुर्दैव तो कर्मचारीही चक्क झोपेत दिसुन आला. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होवू लागली आहे.
जिल्हा उद्योग केंद्रात विविध कामासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. उद्योग केंद्र म्हणून त्याकडे पाहिले जात असले तरी आज दुपारी तेथील चित्र मात्र हे उद्योग केंद्र आहे की निरुद्योगी केंद्र असा प्रश्न त्याठिकाणी येणार्या प्रत्येकाला पडत होता. कार्यालयातील सर्वच खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या. एकाही खुर्चीवर अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. एक कर्मचारी होता तोही चक्क झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. तेथील लेखा विभागातील एका कर्मचार्याकडे विचारणा केली असता इमारतीला कलर काम सुरु असल्याने काही जण बाहेर गेले असतील असे उत्तर त्याच्याकडून मिळाले. जिल्ह्याच्या उद्योगाचे केंद्र असलेल्या कार्यालयाची ही अवस्था असल्याचे पाहून त्याठिकाणी येणारा प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत होता.
Add new comment