लाइव न्यूज़
ऊसतोड मजुरांच्या चालत्या ट्रकने घेतला पेट
Beed Citizen | Updated: April 23, 2018 - 2:45pm
चकलंबा येथील तरूणांंचे प्रसंगावधान; मजुरांसह जनावरांची केली सुटका
बीड (प्रतिनिधी):- ऊसतोडीचा हंगाम संपवून गावाकडे परतणार्या मजुरांच्या चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना चकलंबा (ता.गेवराई) जवळ मध्यरात्री घडली. तेथील ग्रामस्थ व तरूणांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकमधील २० मजुरांसह जनावरांची सुटका केली. चालत्या ट्रकमधुन चालकाने उडी घेतल्यानंतर तरूणांनी जिवाची बाजी लावत दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेवराई तालुक्यातील कासारवाडी येथील ऊसतोड मजुर हंगाम संपवून गावाकडे परत येत असतांना त्यांच्या ट्रकने चकलंबा जवळ अचानक पेट घेतला. चालता ट्रक पेटल्याचे पाहुन चालकाने उडी मारून पळ काढला. गाडीला आग लागल्याने मजुरांसह ट्रकमधील जनावरांना उष्णतेचे चटके बसु लागले. जिवाच्या आकांताने सर्वजण आरडाओरड करू लागताच त्या भागातील ग्रामस्थ व तरूणांनी तात्काळ ट्रकच्या दिशेने धाव घेतली. जिवाची बाजी लावत तरूणांनी ट्रकमधील २० मजुरांना आणि जनावरांनाही सुखरूप बाहेर काढले. पुर्ण ट्रक पेटल्याने केंव्हाही डिझेल टाकीचा स्फोट होवु शकतो या भितीने शिंदे नावाच्या तरूणाने स्वत:चा जिव धोक्यात घालुन ट्रक चालु केला आणि जवळच असलेल्या तलावाच्या पाण्यात घुसवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चकलंबा परिसरातील तरूणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होवु लागले आहे.
‘त्या’ तरूणाने जिव धोक्यात घालुन पेटता ट्रक तळ्यात घुसवला
ऊसतोड मजुरांना घेवून जाणारा चालता ट्रक पेटल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी अनेक तरूणांचे हात पुढे आले. सर्वांनी मजुरांसह जनावरांनाही सुखरूप बाहेर काढले. ट्रकला आगीने पुर्णपणे वेढले होते. कोणत्याही क्षणी डिझेलच्या टाकीचा स्फोट होण्याची भिती असल्याने शिंदे नावाच्या तरूणाने स्वत:चा जिव धोक्यात घालुन ट्रक चालु केला आणि जवळच असलेल्या तलावाच्या पाण्यात घुसवला.
Add new comment