लाइव न्यूज़
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात खासगी सुरक्षा कर्मचार्यांकडून नातेवाईकांना आरेरावी
बीड, (प्रतिनिधी):- येथील जिल्हा रुग्णालयात खासगी सुरक्षा कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिसरातील पार्किंग, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा यासह अन्य कामांकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन खासगी सुरक्षा कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अरेरावी करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एखाद्या नातेवाईकासोबत किरकोळ शाब्दीक वाद झाला तरी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य महिला कर्मचारीही संबंधित नातेवाईकाशी अतिशय उद्धटपणे बोलतात याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजारापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासुन त्याठिकाणी नियुक्त महिला कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी अतिशय उद्धटपणे बोलत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांशी दररोजच वाद घालण्याचे प्रकारही त्यांच्याकडून होवू लागले आहे. एखाद्या नातेवाईकाकडून काही चूक झाल्यास त्याला समजावून सांगण्याऐवजी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या सर्वच महिला कर्मचारी संबंधित नातेवाईकाशी अरेरावी करत दमदाटी करत असल्याचे प्रकारही सर्रासपणे वाढले आहेत. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होवू लागले असुन रुग्णालयात चांगल्या सोयी-सुविधा मिळत असल्या तरी रुग्णालयाच्या आवारात मात्र रुग्णांशी आणि त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांशी होणारी अरेरावी पाहता सर्व स्तरातून संताप व्यक्त होवू लागला आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालयातील सुरक्षा रक्षक पुरवण्याची जबाबदारी संबंधीत कंपनीला टेंडर पध्दतीने दिलेली आहे. टेंडरमध्ये १८ ते २० कर्मचार्यांचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात मात्र ५ ते ७ कमर्चार्याचीच कार्यरत असल्याचेही बोलले जात आहे.
Add new comment