लाइव न्यूज़
व्यसनमुक्तीच्या संमेलनाला आचारसंहितेचे ग्रहण
Beed Citizen | Updated: April 21, 2018 - 3:50pm
बीड, (प्रतिनिधी):- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे स्वागताध्यक्ष असलेल्या व्यसनमुक्ती संमेलनाला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ऐनवेळी आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सकाळी व्यसनमुक्तीसंदर्भात दिंडी काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासुन संमेलनाची जय्यत तयारी सुरु होती. आ.विनायक मेटे यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतला होता. मात्र ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची वेळ सामाजिक न्याय विभागावर आली आहे.
बीड येथे आज दोन दिवसीय सहाव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे उदघाटन होणार होते. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर शहरात दाखलही झाले होते. मात्र काल सायंकाळी निवडणूक विभागाने विधान परिषद निवडणूकीची घोषणा करताच मध्यरात्रीपासुन आचारसंहिता लागू झाली आणि सकाळी ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. गेल्या आठ दिवसांपासुन संमेलनाची जय्यत तयारी सुरु होती. स्वागताध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला होता. मात्र ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याने सामाजिक न्याय विभागासह आ.विनायक मेटे यांचाही हिरमोड झाला.
आचारसंहितेतही शासकीय विश्रामगृहावर वर्दळ!
व्यसनमुक्ती संमेलनासाठी शहरात दाखल झालेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अन्य नेत्यांची शासकीय विश्रामगृहावर सकाळपासुन वर्दळ होती. जिल्हा परिषद अध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही त्याठिकाणी होते. विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता असतांनाही त्याठिकाणी राजकीय नेत्यांची वर्दळ चर्चेचा विषय ठरली होती.
जनजागृती दिंडी
व्यसनमुक्ती संमेलनाच्या अनुषंगाने सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून जनजागृती दिंडी काढण्यात आली. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक सहभागी झाले होते. दिंडीची सांगता माने कॉम्प्लेक्स परिसरातील कार्यक्रमस्थळी झाली.
Add new comment