लाइव न्यूज़
बीड जिल्हा प्रशासनाला प्रधानमंत्री ऍवार्ड!
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी; नागरी सेवा दिनी होणार जिल्हाधिकार्यांचा गौरव
बीड, (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्हा प्रशासनाचा उद्या (दि.२१) नागरी सेवा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव होत आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह आणि जिल्हा कृषि अधिकारी एम.आर.चपळे यांचा प्रधानमंत्री ऍवार्डने दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान होणार असुन देशात जिल्हा एक नंबर ठरला आहे. दरम्यान पुरस्कार स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह व चपळे हे दिल्लीकडे रवाना झाले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या योजनेतर्ंगत उत्कृष्ट प्रशासनातील पुरस्कारासाठी दोन टप्प्यात ऑनलाईन नोंदणी बंधनकारक होती. सदरील योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी २० जानेवारी २०१८ पर्यंत अर्ज भरणे आवश्यक होते. देशातील ४९४ जिल्ह्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची नोंदणी केली होती. बीड जिल्ह्यातूनही प्रधानमंत्री फसल विमा योजनेतर्ंगत उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. सन २०१६-१७ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यातून ५५ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम विमा हप्त्यापोटी भरण्यात आली होती. त्याबदल्यात तब्बल २३३ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी शेतकर्यांसाठी मिळाला होता. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात ६३ कोटी ७१ लाख तर रब्बी हंगामात ८ कोटी ४४ लाख रुपयांच्या रक्कमेचा विमा भरणा करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दखल घेण्यात आली असुन जिल्हा प्रशासनाला उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन प्रधानमंत्री ऍवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या दि.२१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिवस असुन त्यानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम.डी.सिंह आणि कृषि अधिकारी चपळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता होणार्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आणि कृषि अधिकारी हे दिल्लीकडे रवाना झाले आहे.
Add new comment