’ बेटी हूं आपकी, कोई झंडा नही !’
जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. तेथिल पर्वतरांगा निसर्ग सौन्दर्यांची साद घालतात. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणारा जवान शत्रूंना मुंह तोड जवाब देत आहे. अशा वैविध्यपूर्णतेने नटलेल्या काश्मिरात एक कोवळी कळी कुस्करून टाकली जाते आणि व्यवस्थेतील काही लोक तिच्यावर अत्याचार करणार्यांच्या बाजूने भूमिका घेतात , केवढा हा विरोधाभास. ज्या काश्मिरातील निसर्ग सौंदर्याचे गोडवे जगात गायले जातात, जिथल्या मातीत शौर्याचं रक्त सांडल जातंय आज तिथेच माणुसकीचा निर्घृण हत्या झालीय. तिथल्या पर्वतरांगा ओरडून पुन्हा पुन्हा तेच विचारू लागल्यात की, काय दोष होता त्या निरागस आसिफाचा ? आठ वर्षीय आसिफा आज वासनांध शैतानांचा बळी ठरलीय. दिल्लीप्रमाणेच आणखी एका निर्भयाने आजच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत इथे खरंच माणुसकी जिवंत आहे का यावर चिंतन करण्यास भाग पाडले आहे. तिच्यावरील अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे झालेली हत्या यामुळे समाजमने हळहळली. शोक आणि निषेध व्यक्त होऊ लागलाय. ’ जस्टीस फॉर आसिफा ’ अशा कितीतरी पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावरून त्या सैतानांसह शासन व्यवस्थेविरुद्ध राग आवळला जात आहे. दिल्ली , कोपर्डीतील निर्भया नंतर आज आसिफा तर कदाचित उद्या ...! हा विचारच प्रत्येकाच्या डोक्यात झणझणीत मुंग्या आणणारा आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. एक बेटी म्हणून तिच्यासोबत झाले ते अंत्यत निर्दयी असून त्याकडे जात म्हणून पाहणे म्हणजे तो तिचाच नव्हे तर अखंड स्त्री जातीचा अवमान ठरेल.म्हणून तर आसिफाचे वडील म्हणतात , ’ माझ्या छकुलीला उजवा आणि डाव्यातला फरक कळत नव्हता मग तीथे हिंदू - मुस्लिम कोठून आले. लेक म्हणूनच तिच्याकडे पहा , जातीवरून राजकारण करू नका ’ तिच्या वडिलांच्या मनातील शल्य आजच्या व्यवस्थेला आणि समाजमनाला नक्कीच अंतर्मुख करणारं आहे. आज ते ज्या अवस्थेतून जात आहेत तिथे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होण्याऐवजी त्यांच्या तोंडून व्यक्त झालेली हतबलता समाज विशेषतः नेटकरी आणि राजकारण्यांसाठी सणसणीत चपराक आहे.सैतानांनी आधीच तिचे लचके तोडले आहेत , अतिव वेदना दिल्या आहेत असे असताना आज तिच्या गैरहजेरीत तिला जातीच्या चौकटीत कैद करण्याचा प्रयत्न म्हणजे व्यवस्थेकडून पुन्हा तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याची हत्या करण्यासारखेच आहे. ती आज आपल्यात नाही, सैतानांनी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला , अाई - वडिलांपासून तिला दूर केले. शासनकर्त्या जमातीने तिच्यावरील अत्याचार - हत्या दुर्लक्षित केली , राज्यकर्त्यांपैकी काहींनी जातीय द्वेष भावनेतून आरोपींच्या समर्थनार्थ पोलिस ठाण्यावर मोर्चे काढले , प्रशासनातील काही राक्षसी वृत्तींनी त्यांना बळ दिले , गावच्या लोकांनी तिच्या दफनास विरोध केला, कायद्याच्या रक्षणकर्त्यांनी दोषरोप पत्र दाखल करण्यास नकार देत पीडितेच्या वडिलांसाठी न्यायालयाची दारे बंद केली आणि आता पुन्हा एक जात म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे मग हीच का ती लोकशाही ? हाच का तो भारत जिथे विविधतेत एकता नांदते ? सारे भारतीय माझे बांधव आहेत असे ठणकावून म्हटले जाते आणि अच्छे दिनचे वादे दिले जातात. त्या सैतानांनी छळले त्यापेक्षाही अधिक तिला व्यवस्थेने छळले नाही का? , लेकीवरील अत्याचाराचे , तिच्या हत्येचे दुःख सोसणार्या त्या आई - वडिलांना शासन आणि समाज व्यवस्थेने रक्ताचे अश्रू रडविले नाही का ? तिच्या जाण्याने जातीवरून निर्माण होणारे अंतर , आधी आणि नंतरही होत असलेली तिची अवेहलना पाहून ’ बेटी हूं आपकी , कोई झंडा नही ’ असं तर ती म्हणत नसेल ना ?
कठूवा आणि उन्नाव येथील घटना माणुसकीची हत्या करणार्या आहेत. घटना जेव्हढ्या निंदनीय आहेत तेवढीच जबाबदार येथील शासन यंत्रणा आहे. लोकशाही प्रधान देशात मृत्यूनंतरही दफनासाठी जागा न देण्याइतपत लोक निर्ढावले आहेत. घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना गाव सोडून जाण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैवी ते काय ? खरंच इथे सरकार कमी पडले. महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यातच लेकी सुरक्षित नाहीत. सत्तेपुढे संवेदनाही गोठल्या की काय ? सत्तेला पोषक वातावरण निर्मिती करणारे तेथिल सत्ताधारी अशा सैतानी पिलावळींना आणि त्यांना सहकार्य करणार्यांना ठेचून काढण्याचे धाडस दाखवणार का?
केंद्र आणि राज्यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून उपोषण करणारे विरोधक आणि संसदेत विरोधक काम करू देत नाहीत असं म्हणत सत्ताधारी असूनही अन्नत्याग करणारे आता अन्न वर्ज्य करणार का ? अच्छे दिनचे वादे करणारे आणखी किती निर्भया होण्याची वाट पाहत आहेत. अत्याचार झाल्या नंतरच कायदा बदलण्याचे ज्ञान पाजळणारे आत्तापर्यंत कुठे होते ? कठूवा, उन्नाव येथील पीडित कुटुंबानाच नव्हे तर देशातील प्रत्येकाला याप्रकरणात न्याय हवाय. निर्भयाचा बळी घेणारे आणि माणुसकीचा गळा घोटणार्यांना फासावर लटकावल्याशिवाय ’ ती ’ ला न्याय मिळणार नाही. सैतानी वृत्तींना पाठीशी घालण्याGiचा प्रयत्न करणार्यांच्याही नांग्या ठेचून काढण्याची गरज्| जेणेकरून पुन्हा कोणी अशा राक्षसी वृत्तीचे समर्थन करणार नाही.
लेक म्हणून तिच्याकडे पहा, ती कोणत्या जातीची आहे , कोणत्या प्रदेशाची आहे , कोणत्या समूहाची आहे त्यापेक्षा ती एक आईची छकुली आहे, एका वडिलाची लाडो आहे आणि समाजाची बेटी आहे. याची जाणीव ठेवा. दिल्ली , कोपर्डी, कठूवा , उन्नाव प्रमाणे आता पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सैतानी वृत्तीचा बिमोड करायला हवा.
Add new comment