सलमानचा आजचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्जावर उद्या निर्णय
जोधपूर, व्रतसेवा : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला आज दिलासा मिळू शकला नाही. सलमानच्या जामीन अर्जाचा निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आलाय. त्यामुळे सलमान खानचा आजचा मुक्काम हा जेलमध्येच असणार आहे.
आज सकाळी 10.30 वाजता जोधपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश रव्रींद्र कुमार जोशींसमोर सुनावणीला सुरुवात झाली. सलमानचे वकिल आनंद देसाई यांनी सलमानच्या जामिनासाठी 51 पानांची याचिका दाखल केली. सलमानला जामीन मिळावा यासाठी त्यांनी अर्धातास युक्तीवाद केला. सरकारी वकिलांनीही आपली बाजू लावून धरली. त्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाची पोलीस तपासाची केस डायरी मागवून घेतलीये. तोपर्यंत सलमानचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय. उद्या सकाळी 10.30 वाजता पुन्हा या निर्णय सुनावला जाणार आहे.
. वीस वर्षांनंतर काल गुरुवारी जोधपूर सत्र न्यायालयाने या प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवलं. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड ठोठावला. आज जामीन अर्जावर निर्णय न झाल्यामुळे सलमानला जेलमध्येच राहावं लागणार आहे.
Add new comment