मावलाई श्री पुरस्काराने संजय तिपाले सन्मानित

बीड,(प्रतिनिधी):-अध्यात्माचे विचारधारेवर संस्कृती टिकून असते, आपल्या पुढील पिढीला आपली संस्कृती काय आहे याचे ज्ञान होण्यासाठी सातत्याने ऐतिहासीक वृत्तांत देणे गरजेचे आहे. याबरोबरच अध्यात्माचा अभ्यासही हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे यांनी केेले तर पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो. समाजातील वास्तव स्थितीवर नेमकेपणाने तटस्थ राहून भाष्य करता आलेच पाहिजे यासाठी पत्रकारांना भुतकाळातील नव्हे परंतू वर्तमानातील सर्व क्षेत्राचा व्यासंग हवा यासाठी पत्रकारांनी सातत्याने चिंतनशील होणे गरजेचे आहे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनी केले. 
बर्हाणपुर (ता.गेवराई) येथील मावलाई युवक क्रिडा मंडळ व व्यायामशाळेच्यावतीने मावलाई देवी यात्रेनिमित्त दिल्या जाणार्या मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. १ एप्रिल रोजी बर्हाणपुर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेश वाघमारे, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ऍड.अजित देशमुख, दिव्यमराठीचे जिल्हाप्रतिनिधी दिनेश लिंबेकर, संस्थेचे अध्यक्ष विष्णू यादव, सचिव भागवत वराट, सुशील देशमुख, बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संजय तिपाले यांना धार्मिक लिखाणाबद्दल तर उद्योजक शाहिनाथ परभणे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होतेे. प्रास्ताविक भागवत वराट यांनी केले. याप्रसंगी पत्रकार जगिदश पिंगळे म्हणाले, आज प्रत्येकजण वृत्तपत्रातून काही ना काही वाचत असतो. आपले अवांतर वाचन खुप होते. अनेकदा ते आपल्या जीवनात आवश्यकही नसते मात्र वाचण्यात येते. परंतु नवी पिढी सुसंस्कृत करण्यासाठी आपले ऐतिहासीक, सांस्कृतीक वारसे तसेच राष्ट्रपुरूष  आणि त्यांचे देशप्रेम याची माहिती नसते. त्यामुळे प्रत्येकाने चांगल्या विचारांचे वाचन, चिंतन करणे गरजेचे आहे. पत्रकारांनीही चांगल्या लिखाणासाठी अगोदर चांगले वाचन करणे आवश्यक असून त्यात सातत्य राखून नवी माहिती जगापुढे आणण्यासाठी झोकून देवून काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.