लाइव न्यूज़
ऍड.शेख शफीक, शाहेद पटेल शिवसंग्राममध्ये
दोन्ही क्षीरसागरांची युज ऍन्ड थ्रो ची निती; आ.मेटेंना देणार गती!
बीड, (प्रतिनिधी):- दोन्ही क्षीरसागरांमधील राजकारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अधोगतीला कारणीभुत ठरु लागले असुन त्यांची युज ऍण्ड थ्रो ची निती त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्या आ.विनायक मेटे यांच्या राजकीय वाटचालीला गती देणारी ठरते की काय? अशी भिती लोकांमधुन व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने क्षीरसागर काका-पुतण्यापासुन कार्यकर्त्यांच्या गळतीला आतापासुनच सुरुवात झाली असुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.शेख शफिक, युवा नेते शाहेद पटेल यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. आ.विनायक मेटे यांनीही त्यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. या दोघांच्या सोडचिठ्ठीमुळे क्षीरसागरांपुढील अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल होवू लागले आहेत. बीड विधानसभा मतदार संघातही अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. कौटुंबिक कलहानंतर क्षीरसागर काका-पुतणे यांच्यातील राजकीय डावपेच अनेकांना अडचणीत आणणारे असले तरी दोन्ही क्षीरसागरांची निती म्हणजे कार्यकर्त्यांना वापरुन सोडून द्यायचे अशीच असल्याची चर्चा खुद्द कार्यकर्तेच करत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.शेख शफिक आणि युवा नेते शाहेद पटेल यांनी क्षीरसागरांना सोडचिठ्ठी देत शिवसंग्राममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऍड.शेख शफिक यांनी रायुकॉंच्या माध्यमातून जिल्हाभर संघटन बांधणी करुन तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे. केवळ मुस्लिम समाजातच नव्हे तर इतर समाजातही त्यांची वेगळी क्रेझ आहे. यापुर्वीच्या विधानसभा निवडणुकीत ऍड.शेख शफिक यांचे महत्व स्पष्ट झालेले आहे. युवा नेते शाहेद पटेल यांनाही मानणारा मोठा वर्ग असुन क्षीरसागरांच्या नितीविषयी नाराजी व्यक्त करत दोघांनीही त्यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत दोन दिवसापुर्वी मुंबईत आ.विनायक मेटे यांची भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या चर्चेतून दोघांनीही शिवसंग्राममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. आ.मेटे यांनीही त्यांना ग्रीन सिग्नल दाखवले असुन पुढील आठवड्यात बीडमध्ये होणार्या शिवसंग्रामच्या मेळाव्यात त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ओबीसीचे पद मिळूनही ऍड.सय्यद खाजा नाराज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि आ.क्षीरसागर यांचे खंदे समर्थक ऍड.सय्यद खाजा यांना आठवडाभरापुर्वीच ओबीसी विभागाच्या राज्य कार्यकारिणीवर संधी देण्यात आली आहे. मात्र नेत्याकडून होणारे दुर्लक्ष पाहता ऍड.सय्यद खाजा हे देखील क्षीरसागरांवर कमालीचे नाराज असुन ते ही शिवसंग्रामच्या वाटेवर आहेत. मुंबईत ऍड.शेख शफिक आणि शाहेद पटेल यांनी आ.मेटेंची भेट घेतली त्यावेळी तेही सोबत होते अशी माहिती समोर आली आहे.
Add new comment