बीडमध्ये तीन तलाक विधेयकाविरुद्ध ७ एप्रिल रोजी महिलांचा मूक मोर्चा

बीड ( प्रतिनिधी ) संविधानाने सर्व जाती - धर्मांना आपल्या रीती रिवाज जपण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही सर्वजण संविधानाला मानणारे आहोत.  तीन तलाक हे  निमित्त असून शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदरील विधेयक घटनाविरोधी असून त्याबाबत तात्काळ पुनर्विचार करून विधेयक परत घ्यावे या मागणीसाठी दि. ७ एप्रिल रोजी बीड येथे मुस्लिम समाजातील महिलांचा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड महिला समाज सुधार कमिटीच्या खान सबिहा बेगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड येथील मिल्लिया कन्या शाळेत आज आयोजित पत्रकार परिषदेस मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड महिला समाज सुधार कमिटी बीडच्या शाखेच्या खान सबिहा बेगम , मिलिया अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य काझी सबिना अब्दुल कलाम , मिल्लत ग्रुपच्या प्राचार्य आङ्गरीन जाहेद आदींची उपस्थिती होती. यावेळी खान सबिहा म्हणाल्या , इस्लाम धर्माने चौदाशे वर्षांपूर्वी महिलांना  अधिकार दिले आहेत. शरियतच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होत असताना तीन तलाकचे विधेयक अतिशय घाई गडबडीत मंजूर करण्यात आले आहे. विधेयक तयार करतांना कोणत्याही मुस्लिम धर्मगुरू किंवा मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करण्यात आली नाही. सुप्रीम कोर्टच्या २२ ऑगस्ट २०१७ रोजीच्या निर्णयानंतर या विधेयकाची आवश्यकता नव्हती. तीन तलाक विधेयक घटनाविरोधी व महिला , बालकल्याणच्या विरोधी आहे. अलीकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील संयुक्त अभिभाषणात महामहिम राष्ट्रपतींनी मुस्लिम महिलांसंबंधी अपमानास्पद शब्दाचा वापर केला ज्यामुळे मुस्लिम महिलांची मने दुखावली गेल्याचे खान सबिहा म्हणाल्या. मा. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील मुस्लिम महिलंसंबंधीचे आक्षेपार्ह वक्तव्य वगळण्यात यावे अशी  मागणी आम्ही केंद्र सरकारला करत असल्याचे त्या म्हणाल्या.  महिला सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली मुस्लिम महिलांचा अपमान केला जात असून तीन तलाक विधेयकाच्या आडून शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदरील विधेयक मुस्लिम महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे आहे. केंद्र सरकारला मुस्लिम महिलांची एव्हढीच चिंता वाटेत असेल तर त्यांनी अगोदर नजीबच्या आईला न्याय दयावा, पहलूखानची पत्नी आणि जुनैदची आई देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आधी त्यांना न्याय द्यावा आणि मग अन्य मुस्लिम महिलांची चिंता करावी असेही त्या म्हणाल्या. तीन तलाक विधेयकाबाबत तात्काळ पुनर्विचार करून ते परत घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शनिवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बीड शहरातील मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदरील मोर्चा खास बाग आडत मार्केट जवळील मैदानावरून तकीया चौक, रिपोर्टर भवन, जुने एसपी ऑङ्गिस , बशीरगंज , शिवाजी चौक  मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने मुस्लिम महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड महिला समाज सुधार कमिटी बीड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.