लाइव न्यूज़
मुंडे बहिण-भावासह क्षीरसागर काका-पुतणे एका व्यासपीठावर
बीड, (प्रतिनिधी):- राजकारणातील दोन विरुद्ध टोके एकाच व्यासपीठावर दिसल्यास जनतेतून तर्क-वितर्क व्यक्त केले जातात. मात्र त्यातून मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या राजकारणात असेच काहीसे वेगळे चित्र पहायला मिळाले. त्याचाच परिपाक म्हणून लोकांमधून विविध प्रकारचे अंदाज बांधले जाऊ लागले आहे. तागडगाव (ता.शिरुर) येथील नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुंडे बहिण-भाऊ एकत्र दिसले तर बीडमध्ये आशा कर्निव्हल कार्यक्रमाच्या व्यासपीठावर क्षीरसागर काका-पुतणे सोबत दिसले. बहिण-भाऊ आणि काका-पुतणे यांच्यातील टोकाचा राजकीय संघर्ष सर्वपरिचित असतांना दोन्ही नाते एकाच दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र दिसल्याची चर्चा लोकांमध्ये चर्चिली जाऊ लागली आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात कुटूंब कलह नवा नाही. सत्ताकारणासाठी झालेल्या वैचारिक मतभेदावरुन काही कुटूंब विभागली गेली. नात्यांमधील टोकाचा राजकीय संघर्ष अनुभवण्याची सवयच जिल्ह्यातील जनतेच्या अंगवळणी पडली आहे. आशा परिस्थितीत दुरावलेले नाते एकत्र दिसल्यास नव्याने चर्चा होते याची प्रचिती गेल्या दोन दिवसात अनुभवयास आली. भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला अनन्य साधारण महत्व आहे. तागडगाव (ता.शिरुर का.) येथील नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या खा.प्रितमताई मुंडे हे बहिण-भाऊ एकत्र दिसले. दोघांनीही महंत नामदेवशास्त्री यांचे आर्शिवाद घेत सप्ताहाच्या व्यासपीठावरुन राजकीय भाष्य टाळले. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज मिळाली नसली तरी मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले हीच मोठी बातमी माध्यमांना मिळाली. दोघे एका ठिकाणी आल्याचे पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या मात्र त्यामागेही एक प्रकारचा आनंद दिसून आला. आध्यात्माच्या व्यासपीठावर बहिण-भाऊ एकत्र आले हिच अध्यात्माच्या शक्तीची प्रचिती असल्याचे अधोरेखित झाले. त्याच दिवशी बीडमध्ये आशा चित्रपटगृहाच्या कर्निव्हल कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे तथाजिल्हा परिषद सदस्य संदिप क्षीरसागर एकत्र दिसले. स्थानिक राजकारणात एकमेंकावर कुरघोडी करणारे नेते एका कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एव्हाना पालिकेच्या एखाद्या भुमिपुजन कार्यक्रमप्रसंगी काका त्याठिकाणी जाऊन आल्यानंतर पुतणे तिथे भेट देत हे चित्र बीडकरांनी मागील वर्षभरात अनुभवले. परंतु कर्निव्हलच्या कार्यक्रमात एकाच वेळी दोघेही सोबत हा प्रसंग अनेकांना धक्का देणारा असला तरी क्षीरसागर कुटूंबियांवर प्रेम करणार्यांसाठी मात्र सुखद ठरला.
Add new comment