खा. प्रितमताई म्हणाल्या, ‘मेरा भी सलाम अल्लाह के पास जायेगा!’ पासपोर्ट सेवा केंद्र उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्वागताने खा. मुंडे भारावल्या
बीड, (प्रतिनिधी): ‘मैं ना जा सकी तो क्या... आप लोगों के जरीयेसे मेरा भी सलाम अल्लाह के पास जायेगा’ असे म्हणत पासपोर्ट सेवा केंद्रामुळे हज यात्रेसाठी जाणार्या माझ्या मुस्लिम बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याचे खा. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी झालेल्या स्वागताने भारावून गेल्याचे सांगत, पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने असे स्वागत झाले. रेल्वे आणल्यावर तर तुम्ही मला डोक्यावर घेताल, असे सांगण्यासही त्या विसरल्या नाही.
बीड येथे काल झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांमध्ये राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला. भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी भाषणाच्या सुरुवातीला येथे उपस्थित नागरिक आणि भाजप कार्यकर्ते असा उल्लेख करताच नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी त्यांना मध्येच थांबवत याठिकाणी दुसरेेही सर्व कार्यकर्ते आहेत. म्हणून ‘सब का साथ, सबका विकास’ असे म्हणण्याची दुरुस्ती केली. त्याचा संदर्भ घेत खा. मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये आपल्या पक्षाचे धोरणच ‘सब का साथ, सबका विकास’ असल्याचे सांगून आमच्या पक्षाचा विचार विरोधकही मान्य करत असल्याचे नमूद करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. भाषणाच्या शेवटी खा. प्रितमताई यांनी शायरी बोलून दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. ‘मैं ना जा सकी तो क्या... आप लोगों के जरीयेसे मेरा भी सलाम अल्लाह के पास जायेगा’ असे म्हणत त्यांनी पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु झाल्याने माझ्या जिल्ह्यातील मुस्लिम बांधव- भगिनींची सोय झाल्याचे म्हटले. हजला जाता येत नसले तरी त्याठिकाणी जाणार्या माझ्या बांधवांची सेवा हेच मोठे पुण्याचे काम असल्याचे त्या म्हणाल्या.
सलीम जहॉंगिर यांचे
खा.प्रितमताईंकडून कौतुक
खा. प्रितमताई मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सलीम जहॉंगीर यांचा उल्लेख समाजकार्यासह पक्षकार्यात हिरहिरीने सहभागी होणारे सलीमभाई असा केला. ऐवढेच नव्हे तर व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांची माफी मागून थोड्या मतांनी नगराध्यक्षपदापासून बाजुला राहिलेले असाही सलीमभाईंचा उल्लेख केला. पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासंदर्भात माझ्यापासून ते येथील अधिकार्यांपर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे म्हटले.
नगराध्यक्षांकडून खा. प्रितमताईंचे कौतुक
नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर म्हणाले की, पासपोर्ट सेवा प्रयत्नपुवर्क शहरात, जिल्ह्यात आणल्याबद्दल केंद्राचे व खा.प्रितमताईंचे अभिनंदन व आभार. राजकारण, समाजकारणात चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे सांगून नगराध्यक्ष या नात्याने खासदारांचे करणे हे माझे कर्तव्य समजतो, असेही ते म्हणाले.
Add new comment