शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या आत्महत्येचे सत्र सुरुच; दोन दिवसात तिघांनी मृत्यूला कवटाळले

बीड, (प्रतिनिधी):- कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असुन दोन दिवसापुर्वी जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसात तीन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले असुन शासनाकडून होत असलेल्या उपाययोजनाही शेतकरी आत्महत्या रोखू शकल्या नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील विठ्ठल पांडुरंग येवले (६०) यांनी दि.२७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ६० टक्के भाजल्याने आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठल येवले यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. दरम्यान दोन दिवसापुर्वीच गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील महादेव सटवाजी मार्कड (४८) या शेतकर्‍याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली तर बाग पिंपळगाव येथील हनुमान आसाराम थोरात (३२) या शेतकर्‍याने राहत्या घरात गळफास लावून जिवन संपवले. दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.