लाइव न्यूज़
अधिकारी म्हणतात, उपोषण मागे घेतलंय, उपोषणार्थी म्हणतात, सही दिलेलीच नाही! अधिकारी, उपोषणार्थ्यांच्या वादात तान्हुली प्रशासनाच्या दारात
बीड, (प्रतिनिधी):- उपोषणार्थी महिलेची प्रशासनाच्या दारातच प्रसुती झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. आठवड्यात दुसर्यांदा उपोषणस्थळी प्रसुती झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली. उपोषणार्थी बाळंतीणीची भेट घेण्याऐवजी प्रशासनाने स्वत:ची इभ्रत वाचवण्यासाठी केलेला आटापिटा चर्चेचा विषय ठरला आहे. उपोषणार्थ्यानीं दोन दिवसांपुर्वीच उपोषण मागे घेतले होते असे स्पष्टीकरण देवून प्रशासन मोकळे झाले आहे तर उपोषणार्थी महिलेनेही आम्ही उपोषण सोडण्यासाठी सही दिलेली नसल्याचे लेखी पत्र दिले असुन उपोषण सुरुच असल्याचे महिलेने म्हटले आहे. दरम्यान अधिकारी स्वत:च्या बचावासाठी उपोषण मागेेच सोडल्याचा दावा करत आहे तर उपोषणार्थी कुटूंब मागण्या पुर्ण झाल्याशिवाय माघार नाही असे म्हणत असुन अधिकारी आणि उपोषणार्थ्यांच्या वादात दोन दिवसाची तान्हुली मात्र तळपत्या उन्हात प्रशासनाच्या दारातच आहे. नाहक वाद घालण्याऐवजी प्रशासनाने आणि उपोषणार्थ्यांनी किमान त्या मुलीच्या आरोग्याचा तरी विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणार्थी साखरबाई मोती पवार हिने उपोषणस्थळीच एका मुलीला जन्म दिल्याची घटना काल पहाटे समोर आली. या प्रकारानंतर प्रशासनातील अधिकार्यांनी उपोषण सोडता वेळीचे फोटो आणि पत्रावर सही केल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत संबंधित महिलेचे उपोषण दोन दिवसापुर्वीच सुटले होते असा दावा करत या प्रकरणातून अंग झटकण्याचे काम केले आहे. उपोषणार्थी कुटूंबियांतील कविता अप्पाराव पवार यांनी मात्र आजच लेखी पत्र दिले असुन पंचायत समितीचे अधिकारी आमच्याकडे आले. त्यांनी घरकुलासंबंधीचा जीआर दाखवून आमची सही घेतली. आम्ही उपोषण सोडण्यासाठी सही दिलेली नसून पीटीआर व घरकुल मिळावे यासाठी आमचे उपोषण सुरुच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशासनातील अधिकारी उपोषण दोन दिवसापुर्वीच मागे घेत असल्याचा दावा करत असुन उपोषणार्थी मात्र उपोषण सुरुच असल्याचे सांगत आहे. या दोघांच्या वादात दोन दिवसाच्या तान्हूलीच्या आरोग्याचा मात्र कोणीच विचार करेनासे झाले आहे. तळपत्या उन्हात तान्हूली दोन दिवसांपासुन प्रशासनाच्या दारातच असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Add new comment