लाइव न्यूज़
अंगणवाडी सेविकेची हत्या करून पतीची आत्महत्या तांबवा येथील थरार
केज ( प्रतिनिधी ) अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा येथे घडली.
सुंदर बळीराम मुंडे (वय ५०) आणि ललिता सुंदर मुंडे (वय ४६) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. याबाबत प्राप्त माहिती अशी कि, तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका ललिता चाटे यांचा विवाह नागझरी येथील सुंदर बळीराम मुंडे यांचा विवाह झाला होता. पत्नीस अंगणवाडीची नोकरी असल्याने सुंदर मुंडे यांनी तांबवा येथेच जमीन घेतली आणि तिथेच शेती करून शेतातील घरात राहत असत. त्यांना दोन मुले व एक मूलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे तर एक मुलगा मुंबई येथे नोकरीला असून दुसरा औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे घरात पती पत्नी दोघेच राहत होते. मागील काही दिवसापासून पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. सुंदर मुंडे यांनी काल गुरुवार, दि. २२ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी जेवण झाल्यानंतर पत्नी ललिता यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुंदर मुंडे यांचा भाऊ रंगनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यात हत्या आणि आत्महत्येची मालिकाच !
केज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. २० ते २५ दिवसांपूर्वी तालुक्यातीलच ढाकेफळ येथे तरुणाने दहावीची परीक्षा देणार्या एक विद्यार्थिनीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती आजच्या घटनेत झाली असून हत्या आणि आत्महत्येची महिन्यातील ही दुसरी घटना केज तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment