लाइव न्यूज़
बीडमध्ये धान्याचा धनी एसीबीच्या जाळ्यात!
पुरवठा विभागात घबाड सापडले
डीएसओ शेळकेसह कारकुन फड पकडला
कारकुन फड यास १ लाख १५ हजार रूपये घेतांना रंगेहाथ पकडले; शेळकेंच्या सांगण्यावरून लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांनाही उचलले
बीडमध्ये शेळकेंच्या घराची झडती तर औरंगाबादेतील फ्लॅटकडेही टिम रवाना!
बीड, (प्रतिनिधी):-स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध असलेल्या तक्रारीत आपल्या बाजूने निर्णय द्यावा यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर आज दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास पुरवठा विभागातील जिल्हा लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड यास १ लाख १५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके व लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड या दोघांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी शेळके यांनाही कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. एसीबीच्या अधिकार्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांच्या भक्ती कन्स्ट्रक्शनमधील निवासस्थानाचीही झाडाझडती घेण्यास सुरुवात केली असुन औरंगाबाद येथील दोन फ्लॅटच्या तपासणीसाठीही टीम रवाना झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
बीड येथील तहसिल कार्यालयासमोर जोशी उद्यानासमोर आज दुपारी पुरवठा कार्यालयातील लेखा परिवेक्षक बब्रुवाहन परमेश्वर फड (४९) यास तक्रारदाराकडून १ लाख १५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या संदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराने सावित्रीबाई फुले महिला बचत गट या नावाच्या स्वस्त धान्य दुकानातील गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यावरुन जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी रामभाऊ शेळके (५३) यांनी सदर दुकानाची चौकशी करुन त्याचा परवाना रद्द केलेला आहे. त्याचा राग मनात धरुन सावित्रीबाई फुले महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानाच्या परवानाधारक सौ.लव्हाळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारदाराविरुद्ध तक्रार केली होती. सदर प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तक्रार यांना त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस दिली होती. सदर प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांच्याकडे सुनावणी सुरु होती. सुनावणीत तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके व जिल्हा लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड यांनी २ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी जोशी उद्यानासमोर सापळा लावून बब्रुवाहन फड यास तक्रारदाराकडून १ लाख १५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले तर जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांना पुरवठा अधिकारी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील कारवाई लाचलूचपत विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील पोलिस उप अधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलिस निरिक्षक श्रीमती.अर्चना जाधव, पोहेकॉ.दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, राकेश ठाकुर, प्रदिप विर, अमोल बागलाने, मनोज गदळे, सय्यद नदीम यांनी केली. दरम्यान पुरवठा अधिकारीच लाचलूचपतच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असुन धान्याचा धनीच अशा पद्धतीने लाचेची मागणी करत असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Add new comment