लाइव न्यूज़
शिवसेना आमदार चौगुलेंनी विधानसभेतील राजदंड पळवला
Beed Citizen | Updated: March 21, 2018 - 3:26pm

मुंबई, (प्रतिनिधी):-अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा मागे घेण्याची मागणी सत्तारूढ शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. विधानसभेत याप्रश्नी गदारोळ सुरू असतानाच अचानक सेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला.
सभागृहाचे कामकाज आज (दि.२१) सुरू झाल्यापासून सेनेसह विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत गदारोळ घातला. जोपर्यंत मेस्मा रद्द केला जात नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. या गोंधळामुळे सकाळच्या सत्रात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केले होते. परंतु, नंतर कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा या प्रश्नावरून गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी सेनेचे आमदार चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर असलेला राजदंड पळवला.
तत्पूर्वी, सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करत असून त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायचा असेल तर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी शिवसेनेने केली तर मेस्मा कायदा मागे घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. या मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
Add new comment