ती च्या जन्मामुळे त्या वस्तीवरील कुटुंबियांना आशियाना! बाळंतीनीचे उपोषण मागे

बीड, (प्रतिनिधी):- पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कुटुंबासह ठिय्या मांडूनही निर्दयी सरकारी बाबूंनी डुकूंनही पाहिले नाही. मात्र उपोषणार्थी महिलेची उपोषणस्थळीच प्रसृती झाल्याने प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली जातात. झोपेचे सोंग घेणारे अधिकारी खडबडून जागे होत उपोषणस्थळी दाखल झाले. आंबेडकर राईट पार्टी ऑङ्ग इंडियाच्या पदाधिकार्‍यांची मध्यस्ती आणि पाच अधिकारी दाखल झाल्यानंतर दिलेल्या लेखी आश्‍वासनाने वासनवाडीच्या ‘त्या’ कुटुंबांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान पाच दिवसांपासून कोणीच दखल न घेतलेल्या उपोषणार्थ्यांना ‘ती’ च्या जन्मामुळे हक्काचा ‘आशियाना’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वासनवाडी येथील १६ कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.उपोषणार्थी महिलेने उपोषणस्थळीच एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली गेली. या प्रकाराची राज्यभर वाच्यता झाल्यानंतर शेतकरी आंदोलनाच्या नेत्या सुशिला मोराळे, माजी आमदार उषा दराडे आदींनी उपोषणकर्त्यांनी भेट घेतली.  अखेर निद्रिस्त प्रशासनाला जाग आली. ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील, विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी, कल्याण शेळके, ए. एस. मोरे,  वासनवाडीचे ग्रामसेवक बी.एस.शिंदे यांनी उपेाषणकर्त्यांची भेट घेतली. मार्चनंतर वासनवाडी येथे घरकुल ऑनलाईन मंजूर करु, पंधरा दिवसांत बोअरची सोय करु तसेच कायमस्वरुपी पाण्यासाठी विहिर मंजुर करुन देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर पारधी समाजाने उपोषण मागे घेतले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.