डॉक्टरांचा हलगर्जीपणा ; उपचाराविना एकाचा बळी
पटोदा, (प्रतिनिधी):- छातीमध्ये दुखत असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एकाला जीवाशी मुकावे लागल्याची घटना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा अंधाधुंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील लऊळवाडी येथील नानाभाऊ जगन्नाथ लऊळ (वय ५५) यांच्या छातीमध्ये रविवारी सकाळी अचानक दु:खु लागले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने व इतर एकाने त्यांना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दुचाकीवरून दाखल केले होते. मुख्य मार्गावरून रुग्णालयात नानाभाऊ लऊळ हे स्व:ता पायी चालत गेले. त्यामुळे उपचारानंतर सर्व काही ठिक होईल अशी अपेक्षा सर्वच नातेवाईकांना होती. मात्र, रुग्णालयात उपचार करणारेच कोणी नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. रुग्णालयात केवळ एक परिचारिका आणि शिपाई उपस्थित होते. दरम्यानच्या कालावधीत सिस्टर लता चोले यांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना रक्तदाबाच्या गोळ्या दिल्या आणि वरीष्ठांना संपर्क केला. रविवारी वैद्यकीय अधिकारी इमराना शेख यांची ड्यूटी होती. मात्र, त्या उपस्थित नसल्याने रुग्णावर योग्य ते उपचार झाले नसल्याचा आरोप आता होत आहे. रुग्णालयातील या कारभारामुळे नातेवाईक संतंप्त झाले असून संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच माजी सभापती आनंद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ऐन गुढीपाडव्या दिवशी अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. असे असूनही दुपारी १ पर्यंत आरोग्य विभागातील एकही वरीष्ठ अधिकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला नव्हता हे विशेष.
Add new comment