लाइव न्यूज़
पुलिस सब जानती है फिरभी अफसाना ढुंड रही है! गांजाची धुंदी उतरेना; अर्थपुर्ण तडजोडीची चर्चा संपेना
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी भागात पोलिसांनी छापा टाकून १७ किलो गांजा जप्त करुन दोन दिवस झाले तरी त्याची धुंदी मात्र अजुनही कायम असल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरा पोलिसांनी ज्या वाहन क्रमांकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तो छोटा हत्ती ताब्यात घेतला आहे. आरोपीचा अजुनही पत्ता नसल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘पुलिस सब जानती है फिरभी अफ ‘साना’(किस्सा) ढुंड रही है’ अशी चर्चा होवू लागली असुन पोलिसांच्या भुमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. सदरील प्रकरणात अर्थपुर्ण तडजोड झाल्याचीही चर्चा जोर धरु लागली आहे.
बीड शहरात पोलिसांनी कारवाई करुन १७ किलो गांजा पकडला. मोठी कारवाई केल्याच्या धुंदीत असलेल्या पोलिस अधिकार्यांना अजुनही आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. ज्या ठिकाणी कारवाई करुन गांजा पकडण्यात आला त्या कंपाउंड अर्थातच जागा मालकाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. एरव्ही रस्त्यावर उभ्या असलेल्या सामान्य व्यक्तीच्या वाहनावर कारवाई करतांना त्याची सर्व कुंडली बाहेर काढली जाते आणि रहदारीस अडथळा निर्माण केला म्हणून संबंधित वाहन मालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. अशा कारवाईतून दाखवण्यात येणारी तत्परता गांजा जप्तीच्या प्रकरणात का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. छोटा हत्ती ज्या कंपाउंडमध्ये उभा होता त्या जागा मालकाची चौकशी पोलिस तपासाच्या दृष्टीने महत्वाची असतांनाही एकाही अधिकार्याने तशी तसदी घेतली नाही. कारवाई होऊन दोन दिवस उलटले तरी आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने या प्रकरणात अर्थपुर्ण तडजोडीची चर्चा जोर धरु लागली आहे. पोलिसांना सर्व काही माहित असतांनाही गाफिलपणा आणि दिरंगाई कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
पोलिसांची अजबच तर्हा; कारवाईनंतर ३६ तासांनी छोटा हत्ती घेतला ताब्यात
बीडमधील गांजा प्रकरणात झालेल्या कारवाईत मोठा घफला असल्याचा संशय सामान्यांतून व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी पहाटे कारवाई केल्यानंतर पोलिसांनी १७ किलो गांजा जप्त केला. मात्र ज्या वाहनात गांजा सापडला तो छोटा हत्ती आहे त्याच ठिकाणी सोडून पोलिस ठाण्यात आले. पहाटेची कारवाई सायंकाळी दाखवून गुन्हा दाखल केला तोही छोटा हत्ती या वाहन क्रमांकावरच. मालकाचे नाव माहित नसल्याचे तक्रारीत नमुद केल्यानंतर सदरील प्रकाराची वाच्यता होताच रात्री उशिरा ज्या ठिकाणी कारवाई केली होती त्याच कंपाउंडमधुन पोलिसांनी छोटा हत्ती ताब्यात घेतला. गांजा जप्त करतांनाच छोटा हत्ती ताब्यात का घेतला नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गांजा प्रकरणातील सत्य समोर आणा; नागरिकांची मागणी
बीड शहरात पोलिसांनी ज्याठिकाणी कारवाई केली आहे तो परिसर उच्चभ्रू वस्तीचा आहे. एका आरोपीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात पुर्ण कॉलनीचे नाव बदनाम होत असल्याची चर्चा लोकांमध्ये होवू लागली आहे. दोन दिवसांपासुन गांजाचा घमघमाट पोलिस दलाभोवती पसरत असतांनाही वरिष्ठ बघ्याची भुमिका घेत असल्याने सामान्यांतून संताप व्यक्त होवू लागला आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणावे अशी मागणी त्याच कॉलनीमधील सुजान नागरिकांनी केली आहे.
एसपी साहेब,खाकीची
प्रतिमा मलीन होतेयं!
गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. मोबाईलचे ईएमआय क्रमांक बदलणार्या टोळीशी पाच कर्मचार्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हाही दाखल झाला. त्यापाठोपाठ आष्टीतील महिला अत्याचार प्रकरणाच्या राज्यभर झालेल्या चर्चेने पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर आता गांजा प्रकरणातूनही अनेक संशयांना वाट मिळू लागली आहे. याप्रकरणातील कारवाईपासून आजपर्यंतचा घटनाक्रम पाहिला असता, कुठं तरी पाणी मुरतयं हे स्पष्ट जाणवत असतांनाही दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थितीत होवू लागला आहे.
Add new comment