लाइव न्यूज़
राज ठाकरेंची पवारांशी बंद दाराआड चर्चा
मुंबई, (प्रतिनिधी):- मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या एक दिवसाआधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीचा तपशील कळू शकला नाही. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. गुढीपाडव्या निमित्त मनसेचा उद्या रविवारी मेळावा आहे. या मेळाव्यात राज पुढील राजकीय वाटचालीचं मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात राज आणि पवार एकत्र येण्याची शक्यताही वर्तविली जात असून राज आजच्या भेटीबाबत उद्याच्या मेळाव्यात भाष्य करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचं उद्या रविवारी प्रकाशन होत आहे. यावेळी शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याआधीच राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
Add new comment