लाइव न्यूज़
पोलिस कारवाईनंतर गांजाचा घमघमाट; वाहनावर गुन्हा मात्र मालकाचा ताळमेळ लागेना!
Beed Citizen | Updated: March 17, 2018 - 3:14pm
घराच्या कंपाउंडमध्येच गाडी तरीही पोलिस म्हणतात मालकाचे नाव माहित नाही
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील झमझम कॉलनी भागात काल पहाटे एका ठिकाणी छापा टाकुन पोलिसांनी १७ किलो गांजा पकडला होता. या प्रकरणात कारवाई झाल्याचे सांगुन पोलिसांनी काल सायंकाळपर्यंत कमालीची गुप्तता पाळली होती. अखेर रात्री उशिरा या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात छोटा हत्ती वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत अजुनपर्यंत मालकाचे नाव माहित नाही असे नमुद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या घराच्या कंपाउंडमध्ये सदरील वाहन आणि त्यामध्ये गांजा सापडला त्या मालकाकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान पोलिस कारवाईनंतर सर्वत्र गांजाचा घमघमाट सुटला असुन उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. पोलिसांना वाहनाचा क्रमांक मिळतो, जागा दिसते तरीही त्याच्या मालकाचा ताळमेळ जुळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीड शहरातील झमझम कॉलनी भागात एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सहकार्यांसह छापा टाकुन १७ किलो १२२ ग्रॅम ६८ हजार ४८८ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. या प्रकरणात रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात वाहन क्र (एमएच.२३ डब्ल्यू १६१०) या छोटा हत्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन मालकाच्या नावाचा उल्लेख फिर्यादीत नमुद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारवाईत सदरील वाहन घराच्या कंपाउंडमध्ये उभे होते तरीही पोलिसांना मालकाच्या नावाचा ताळमेळ का लागेना असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या घराच्या कंपाउंडमध्ये सदरील वाहन सापडले यावरुनही पोलिसांना मालकाचा शोध का लावता येईना? याचेही उत्तर मिळालेले नाही. सदरील कारवाईतून संशयाचा धूर निघत असुन कारवाई होऊनही सत्य परिस्थिती आणण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याची चर्चा शहरभर होवू लागली आहे. वरिष्ठ अधिकार्याने केलेल्या कारवाईनंतर गांजाचा घमघमाट सर्वत्र होवू लागला असुन या प्रकरणात पोलिसांची स्पष्ट भुमिकाही समोर आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाहन क्रमांक असुनही मालक सापडेना!
बीड शहरात एका उच्चभू्र वस्तीत मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत असले तरी या प्रकरणातील सत्य परिस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी वाहन क्रमांक असलेल्या छोटा हत्तीवर गुन्हा दाखल केला असुन मालकाचे नाव माहित नसल्याचा उल्लेख केला आहे. वाहनावर क्रमांक असल्याने त्याच्या मालकाचा शोध घेणे सहज शक्य झाले असते मात्र तेवढीही तसदी पोलिस अधिकार्यांना का घ्यावीशी वाटली नाही असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. यावरुन पोलिस अधिकार्यांना तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्याविषयी देखील ज्ञान नाही का? अशीही चर्चा लोकांमध्ये होवू लागली आहे.
पहाटेची कारवाई दाखवली सायंकाळी!
बीड शहरातील झमझम कॉलनीत काल पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करुन १७ किलो गांजा पकडला. स्वत: पोलिसांनीही कारवाईला दुजोरा देत मोठी कारवाई झाली असुन मोठा मुद्देमालही जप्त केल्याचे सांगितले होते. असे असतांना शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गुन्हा सायंकाळी ५.५ मिनिटांनी घडल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर आजच्या तारखेत म्हणजेच दि.१७ रोजी रात्री १२.२२ मिनिटांनी दाखल झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. गुन्हा घडला आणि दाखलच्या प्रक्रियेत झालेला विलंबच अनेक संशयांना मार्ग दाखवणारा असल्याची चर्चा होवू लागली आहे.
Add new comment