बीडमध्ये सामान्यांची लूट ; हॉस्पिटल आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांचे साटेलोटे !

तारखेच्या तफावतीतून मिलीभगतचे संकेत उघड ; सामान्य रुग्णचं करू लागले भांडाफोड !
बीड ( प्रतिनिधी ) सामान्यांच्या नजरेतून डॉक्टरकडे देवमाणूस म्हणून पाहिले जाते. प्रत्येक डॉक्टर आपल्या सेवेशी प्रामाणिक असतोच. रुग्णाची सेवा आणि त्याच्यावर योग्य उपचार हे डॉक्टरांचे कर्तव्य ते इमाने इतबारे पार पाडतात. मात्र अलीकडे काही जण रुग्णसेवेला व्यवहारिकतेच्या चष्म्यातून पाहू लागल्याने वैदयकीय क्षेत्राची प्रतिमा डागाळत आहे. बीड शहरामध्ये तर काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरवाल्यांचे साटेलोटे असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांनीच हा प्रकार चव्हाट्यावर आणल्याने खळबळ उडाली आहे.एका सोनोग्राफी सेंटर चालकाने प्रसूतीसाठी दिलेल्या तारखेत मोठी तफावत आढळून आली आहे. एव्हढेच नव्हे तर प्रसूतीची वेळ निघून गेली आता तुम्ही सिझर करा असा सल्ला द्यायलाही सोनोग्राफी सेंटर चालकाने मागे पुढे पाहिले नाही.
बीड शहरातील मीना खानम ( नाव बदलले ) ही गर्भवती येथीलच एका स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डायगोनस्टिक सेंटर मध्ये दि. ६ जानेवारी रोजी सोनोग्राफीसाठी गेली होती. सोनिग्राफी रिपोर्टमध्ये प्रसूतीसाठी १८ फेब्रुवारी २०१८ ही संभाव्य तारीख देण्यात आली. मात्र त्या तारखेपर्यंत प्रसूती न झाल्याने त्या महिलेने पुन्हा त्याच डायगोनस्टिक सेंटरकडे धाव घेतली असता वेळ होवून गेली आहे, तुमची नॉर्मल प्रसूती होऊ शकत नसून सिझर शिवाय पर्याय नाही असा सल्ला संबधित सोनोग्राफी सेंटर चालकाने दिला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या मीना खानम यांच्या कुटुंबीयांनी अन्य एका सेंटर मध्ये सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेवून सोनोग्राफीही केली. त्या रिपोर्ट मध्ये मात्र सदर महिलेस १२ मार्च २०१८ ही संभाव्य तारीख प्रसूतीसाठी देण्यात आली. यावरून पहिल्या डायगोनस्टिक सेंटर चालकाने तारखेची तफावत आणि त्यातून रुग्णाला भीती दाखवत सिझर करण्याचा दिलेला सल्ला व त्यांनतर त्याच महिलेची सोनोग्राफी अन्य ठिकाणी केल्याने सोनोग्राफी सेंटर चालकांकडून सुरू असलेली लूट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीच चव्हाट्यावर आणली. एका प्रकरणावरून सोनोग्राफी सेंटर चालक आणि डॉक्टरांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट ’संकेत ’ मिळू लागले आहेत. डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या डायगोनस्टिक सेंटरकडे केलेली सोनोग्राफी ग्राह्य धरून त्याच्या सल्ल्याप्रमाणे पाऊल उचलले असते तर त्या महिलेचे कोणत्याही क्षणी सिझर झाले असते. मात्र सदरील महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऐनवेळी तडकाफडकी निर्णय घेत अन्य ठीकाणी सोनोग्राफी करण्याची घेतलेली  ’ दिशा ’ परिणामकारक ठरली आहे. त्यामुळेच  सोनोग्राफी सेंटर चालक  आणि डॉक्टरांची मिलीभगत चव्हाट्यावर आली आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.