'ती' लग्नासाठी जयपूरहून बीडला आली; मात्र 'कोवळे' प्रेम पाहून आल्या पाऊली परतली
बीड : चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्याप्रेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे समजले. ही सर्व परिस्थिती अनुभवल्यानंतर मुलाच्या कुटूंबियांच्या मदतीनेच ती आल्या पाऊली परतली. हा प्रकार शुक्रवारी बालेपीर भागात घडला. मात्र प्रेमात वेडा झालेला मुलगा बेपत्ता असून याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
प्रत्येकाच्या हाती अँड्रॉईड मोबाईल आले आहेत. मोबाईलमध्ये इंटरनेट असल्याने सर्व सुविधा मोबाईलमध्येच उपलब्ध झाल्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर याच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे. यातील फेसबुकच्या आहारी बीड शहरातील बालेपीर भागात राहणारा कलीम (नाव बदललेले) गेला. सध्या बारावीच्या वर्गात तो शिक्षण घेत आहे. मागील चार महिन्यांपूर्वीच त्याची फेसबुकवरून राजस्थानमधील जयपुर येथील मनिषा (नाव बदललेले) या २६ वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली. दोघांची चॅटींग वाढली. यातून त्यांची चांगलीच मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, हे त्यांनाही समजले नाही.
आपण दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हे समजल्यावर त्यांनी लग्नाचा विचार केला. दोघांकडूनही लग्नासाठी होकार मिळाला. हा सर्व प्रकार केवळ मनिषा आणि कलीम या दोघांमध्येच होता. याची दोघांच्याही कुटूंबियांना तिळमात्र कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे मनिषाला बीडला बोलविण्यात आले. शुक्रवारी ती एका चिमुकलीला घेऊन बीडला आली. कलीमने तिला बसस्थानकावरून घरी नेले. अचानक आपला मुलगा एका मुलीला घरी घेऊन आल्याने कुटूंबियही चक्रावले. कलीमने सर्व हकिकत सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. परंतु त्यांनी यावर शांत राहणे पसंत केले.
सर्व माहिती घेतल्यावर मनिषा ही कलीमपेक्षा ९ वर्षांनी मोठी असल्याचे समजले. मनिषाने तात्काळ लग्नाला नकार दिला आणि आपल्याला औरंगाबादला सोडण्याची विनंती कलीमच्या कुटूंबियांकडे केली. त्यांनी तिला औरंगाबादला नेऊन सोडले. परंतु त्यानंतर अवघ्या काही तासांतच कलीमही घरातून बेपत्ता झाला. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. नातेवाईकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलाला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. ही घटना सध्या बीड शहरात चर्चचा विषय बनली आहे.
लग्नासाठी धरला हट्ट
मनिषाच्या वयाची माहिती घेतल्यावर कुटूंबियांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. परंतु कलीम मनिषाच्या प्रेमात वेडा झाला होता. मला मनिषाची सोबतच लग्न करायचे आहे, असा हट्ट त्याने कुटूंबियांकडे धरला होता. परंतु यात त्याला अपयश आले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. मग त्याने स्वता:हून पलायन केले की त्याला कोणी पळवून नेले? याचा तपास पोलीस करीत आहेत.
शोध सुरु आहे
मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार घेतली आहे. या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. लवकरच याचा तपास पूर्ण करू. मुलाचा शोध घेणे सुरू आहे. अद्याप तो मिळालेला नाही.
- आर.ए. शेख, पोउपनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड
Add new comment