आघाडीचे नगरसेवक फारूख पटेल यांचे सदस्यत्व कायम
बीड, (प्रतिनिधी):- विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना इम्तियाज बशीर तांबोळी यांनी आघाडीचे नगरसेवक फारूख पटेल यांच्याविरोधात अपात्रतेची तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी कलम ४४/४ अन्वये निर्णय देत अपात्रतेची कारवाई केली होती. याविरोधात नगरविकास मंत्रालयाकडे नगरसेवक फारूख पटेल यांनी अपिल दाखल केले होते. त्याचा नगरविकास मंत्रालयाने निर्णय देत त्यांचे नगरसेवकपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फारूख पटेल यांना दिलासा मिळाला आहे.
सय्यद फारूख अली नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणूकीत नगरसेवकपदी विजयी झाले होते. त्यांच्या मालकीच्या नगर परिषद हद्दीत घर मिळकत क्रं.१-३-२४९६ या जागेवर सन २०१४ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. तथापी बांधकाम नियम व परवाना न घेता केल्याची तक्रार इम्तियाज तांबोळी यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका अर्जान्वये केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी फारूख पटेल यांना १६-१०-२०१७ च्या आदेशान्वये महाराष्ट्र नगर परिषद आदी नियम १९६५ कलम १६-१ (एच) ४४-१ चा भंग केल्याप्रकरणी नगरसेवकपदावरून अपात्र ठरविले होते. याप्रकरणी फारूख पटेल यांनी नगरविकास मंत्रालयाकडे अपिल दाखल केले होते. याची दखल घेत नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आघाडीचे नगरसेवक फारूख पटेल यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आघाडीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Add new comment