बीड जिल्ह्यातील कॉंग्रेसला ताकद देणार-खा.चव्हाण
बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील कॉंग्रेसला ताकद देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. यापुढेही येथील कॉंग्रेसला अधिक ताकद देवून नेते , पदाधिकारी यांना एकत्र करून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. आघाडीची प्राथमिक चर्चा सुरू असून त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.येथील विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत खा.चव्हाण बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ट नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, खा.रजनीताई पाटील, माजी आ.सिराज देशमुख, सुरेश नवले आदिंची उपस्थिती होती. खा.चव्हाण म्हणाले, बीड जिल्ह्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. कर्ज माफीत त्यांना अपयश आले आहे. बोंडअळीग्रस्त बाधीत शेतकर्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाला जाळ्या बसवण्यात व्यस्त आहेत. राज्यात आणखी कुठे-कुठे जाळ्या बसवणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जाळ्या बसवून, पोकळ आश्वासने देवून शेतकर्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांच्या शेतमालाला भाव आणि बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत बोलतांना ते म्हणाले, दोन्ही पक्षाकडून प्राथमिक चर्चा सुरू आहे. आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही पक्षाचे श्रेष्टी याबाबत निर्णय घेतील. असेही त्यांनी सांगितले.
Add new comment