अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थीनीवर गेल्या एक दशकापासून अन्याय

अल्पसंख्यांक वस्तीगृहासाठी आ.विनायक मेटे यांनी पुढाकार घ्यावा
शेख तालेब | बीड
बीड तालुक्यात विविध प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह आहेत. मात्र अल्पसंख्यांक मुलींना हेतु पुरस्सर काही मंडळींकडून डावलण्यात येत असल्याचा आरोप लोक प्रतिनिधीवर करण्यात येत आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी श्रीक्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगिण विकासासाठी २५ कोटी रूपयांचा विविध विकास कामाचा निधी आणला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत या कामाचे भुमीपूजन होणार आहे. बीडमध्ये अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाचा कित्येक वर्षापासुनचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावावा. अशी मागणी अल्पसंख्यांक समाजाकडून होत आहे.
शासनाच्या कल्याणकारी धोरणाचा विविध विकास योजनाचा लाभ अल्पसंख्यांक समाजाला विशेषत: त्या समाजातील मागास घटकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे उक्त समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक लाभापासून वंचित होत चालला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने न्यायमुर्ती सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने मुस्लिम समाजाचा अहवाल केंद्र शासनास सादर केला होता. अल्पसंख्यांक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सच्चर समितीने केलेल्या शिफारशीपैकी ही एक होती. त्यानुसार मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्‍चन, शिख व पारसी या अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वस्तीगृह सुरू करण्याची एक होती. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींसाठी वस्तीगृह बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यापैकी केंद्र शासनाने राज्यातील ज्या २५ जिल्ह्यामधील ४३ शहरे ‘अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रे’म्हणून निवडण्यात आले होते. बीड जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाची संख्या लक्षणीय असून यामुळे जिल्ह्यातून बीड व परळी या शहराची अल्पसंख्यांक मुलींची वस्तीगृहासाठी निवड करण्यात आली होती. परळी याठिकाणी ‘जमियत उलेमा हिंद’ यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलने घेवून व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने नगर परिषद परळी याने जागा उपलब्ध करून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्यामार्फत वस्तीगृह बांधण्यात आले असून आत्तापर्यंत सहा कोटीच्या जवळपास निधी या वस्तीगृह बांधकामासाठी वापरण्यात आला असून त्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारण्यामागे ग्रामीण भागात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. ते वाढविण्यासाठी बीड शहरात वस्तीगृह उभारण्यामागे या मुलींना शिक्षणाचे प्रवाहात सामील होण्यास अडचण होवू नये हा उद्देश आहे. परंतू मागील एक दशकापासून जागेची चाचपणी करण्यात येत असून काही ना काही कारणे पूढे करून नंतर ती जागा रद्द करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आत्तापर्यंत तहसिलदार बीड व बीडीओ यांना दहा पत्रे लिहून सुध्दा अजुन त्यांवर संबंधीत अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी हालचाल केली नाही. म्हणून आ.विनायक मेटे यांनी शहरातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या वस्तीगृहासाठी पुढाकार घेवून वस्तीगृह जागेचा प्रश्‍न मार्गी काढावा अशी मागणी बीड शहरातील अल्पसंख्यांक समाजाकडून होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.