गेवराईत उद्या ना.धनंजय मुंडे करणार गारपीट भागाचा दौरा
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे उद्या गेवराई तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. तालुक्यातील खळेगाव, उमापूर व धोंडराई भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांशी ते सुसंवाद करणार आहेत. धोंडराई येथे गावालगतच्या वस्तीवर पडलेल्या दरोड्याच्या ठिकाणी ना.मुंडे भेट देणार आहेत. त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
रविवार, दि.११ रोजी सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या गारपीट आणि वादळी वार्यामुळे गेवराई तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर, धोंडराई, महांडुळासह तालुक्यातील २९ गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ज्वारी, गहू, हरबरा या रब्बी पिकांसह पपई, आंबा, मोसंबी या फळपिकांचे आणि झेंडू सारख्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेले पिक आणि मेहनत वाया गेल्यामुळे शेतकर्यांमध्ये नैराश्येची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना अद्याप शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये शासन विरोधी संतापाची भावना आहे.
गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भावना जाणून घेवून त्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे गारपीटग्रस्त भागाच्या दौर्यावर येत आहेत. यानिमित्ताने ते खळेगाव, उमापूर आणि धोंडराई परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकर्यांशी सुसंवाद करणार आहेत. नुकताच धोंडराई गावाजवळील वडाचा मळा या वस्तीवर उपसरपंच बद्रीविशाल निकम, ग्रामपंचायत सदस्य कचरू साखरे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात महिला आणि पुरुषांना झालेली अमानुष मारहाण व दरोड्याचा तपास लावण्यात पोलिसांना आलेले अपयश याप्रकरणी ना.धनंजय मुंडे दरोडा पडलेल्या वस्तीला भेट देवून तेथील दहशतग्रस्त कुटूंबियांशी भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, खरेदीविक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती भरतराव खरात, माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, डॉ.विजयकुमार घाडगे, जालिंदर पिसाळ, कुमार ढाकणे, पाटीलबा मस्के, शाम मुळे, ऋषिकेश बेदरे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Add new comment