बीडच्या विद्यार्थ्याने केली स्वत्हा केरळमधुन अपहरणकर्त्यांच्या तावडीतुन सुटका

बीड|प्रतिनिधी

जामखेड येथील आठवडी बाजारातुन भरदिवसा गुंगीचे औषध तोंडाला लावून १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी या मुलास केरळ या ठिकाणी घेऊन गेले होते. मात्र, मोठ्या धाडसाने या मुलाने गाडीच्या काचा फोडून स्वत:ची सुटका करवून घेण्यात यश मिळवले.

अर्जुन हनुमंत कुऱ्हाडे (वय १४, रा. अंबेजोगाई, जि. बीड) असे अपहरण करून सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबेजोगाई येथील एका शाळेत इयत्ता ९वीमध्ये शिक्षण घेत असलेला अर्जुन हा सुटी असल्याने आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी जामखेड येथे आला होता. त्याचे आई-वडील मोहा फाटा येथील खडीक्रशरवर मोलमजुरी करतात. ३ फेब्रुवारी रोजी जामखेड येथील आठवडी बाजार आसल्याने अर्जुन हा आई वडिलांसोबत बाजारात आला होता. जामखेड नगरपालिकेजवळ अर्जुन लघुशंकेसाठी गेला असता एका इसमाने त्याच्या तोंडावर गुंगीचे औषध असलेला रुमाल लावून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण केले.

इकडे मुलगा लघुशंकेसाठी गेला असला तरी बराच वेळ झाला असल्याने त्याच्या आईवडिलांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे त्याच्या पालकांनी जामखेड पोलीस ठाण्याला माहिती दिली. इकडे अपहरण झालेला मुलगा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर त्यास आपले अपहरण झाले असल्याचे लक्षात आले. अपहरणकर्ते मुलास थेट केरळ येथे घेऊन गेले होते. जामखेडला सातत्याने वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडत असताना आता नव्याने अपहरणाच्या घटना घडू लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
बटेवाडी येथील एक १३ वर्षांची मुलगी ६ रोजी सकाळी ११ वाजता सायकलवर जामखेड येथील शाळेत चालली होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजुबाजूला लोक असल्याने त्यांचा प्रयत्न फसला. आरोपींनी मुलीस गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्याबरोबरच तिच्या डोक्याचे केस कापून घटनास्थळाहून पळ काढला. मुलीच्या वडिलांनी रस्त्याच्या कडेला पडलेली सायकल पाहिल्याने सदरची घटना लक्षात आली. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे; परंतु गुन्हा दाखल झालेला नाही.

अर्जुनने अशी करून घेतली सुटका
केरळमध्ये गाडीतील चारजण रोडच्या कडेला गाडी उभी करून बाहेर टपरीवर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अर्जुनने गाडीत असलेल्या लाकडी दांडक्याने काचा फोडून पळ काढला. जवळच असलेल्या रेल्वेस्थानकात जाऊन रेल्वेच्या एका डब्यात लपून बसला. ही घटना रेल्वेमधील प्रवाशाला सांगितली. ही रेल्वे गोवा येथे आली असता प्रवाशाने त्याला मडगाव रेल्व पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. मडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) जामखेड पोलीस ठाण्याला फोनवर माहिती दिली. यानंतर जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बापू गव्हाणे व श्रीकृष्ण केकाण यांनी गोवा येथील मडगाव पोलिसांकडून काल मुलास ताब्यात घेऊन आज जामखेड येथे आणले. यावेळी अर्जुनला पाहून पालकांनी आनंद व्यक्त केला. नगरसेवक मोहन पवार यांनी या कामी मदत केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.