बीडच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा !

राष्ट्रवादीची अडचण; पापा मोदींकडुन घडी बसविण्याचा प्रयत्न; अनेकांच्या पक्षप्रवेशाचे संकेत
बीड (प्रतिनिधी):-  राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली असुन पक्षश्रेष्ठींकडुन ग्रीन सिग्नल मिळताच त्याची औपचारीक घोषणा होणार आहे. जिल्ह्यातही आघाडी झाल्यास राजकीय समीकरणे बदलणार हे निश्‍चित असुन कॉंग्रेसने आत्तापासुनच जिल्ह्यातील ३ मतदारसंघावर दावा केला आहे. त्यात बीडचे नाव अग्रभागी आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी स्वत: तीन जागा मागणार असल्याचे स्पष्ट केले असुन त्ंयामध्ये बीडसह केज आणि परळीचा समावेश आहे. या माध्यमातुन मोदी यांनी अनेकांच्या पक्षप्रवेशाचे संकेतच दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्या तुलनेतील नेते आमच्याकडे असल्याचेही स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसने आत्तापासुनच बीडच्या जागेवर दावा केल्याने आगामी काळात राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यता आहे. 
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय समीकरणांनी वेग घेतला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असुन दोन्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडुन ग्रीन सिग्नल मिळताच आघाडीची औपचारीक घोषणा होणार आहे. बीड जिल्ह्यातही आघाडी झाल्यास बीड,केज,परळी या तीन जागा कॉंग्रेस मागणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर बीडसाठी तुल्यबळ नेते आमच्याकडे असतीलच अशी पुष्टीही जोडली आहे. मोदी यांनी या माध्यमातुन पुढील काळात काही मातब्बरांच्या पक्षप्रवेशाचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे बीड आणि जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस कमकुवत असल्याचे निरीक्षण प्रदेश पातळीवरून नोंदविण्यात आली असुन त्यादृष्टीने या दोन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यामुळेच आघाडीची औपचारीक घोषणा झाल्यास बीडच्या जागेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतदारसंघावर मोदी यांच्या टिमने दावा केल्याने पेच निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात आघाडी होऊन  कॉंग्रेस बीडच्याच जागेवर अडुन बसल्यास राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी पुढील काळात अनेक राजकीय समिकरणे दिसुन येतील हे मात्र निश्‍चित. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण दि.१५ फेब्रुवारी रोजी बीड मुक्कामी येत आहेत. सायंकाळी शहरात दाखल होणारे चव्हाण रात्री उशीरापर्यंत बैठका आणि पक्षीय नेत्यांशी गुप्तगु करणार आहेत. खा.चव्हाणांचा मुक्काम कॉंग्रेसच्या पथ्थ्यावर पडण्याचे संकेत असुन या मुक्कामात राजकीयदृष्ट्या गुप्त खलबत्ते होण्याचे संकेत आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.