लाइव न्यूज़
आघाडीची घडी बसण्याचे संकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची गुप्तगु सुरू; बैठकीत २०१९च्या आघाडीसाठी बोलणी
Beed Citizen | Updated: February 6, 2018 - 3:46pm
मुंबई (प्रतिनिधी) सत्तेत सहभागी असुनही शिवसेनेने भाजपविरूध्द सवता सुभा घेण्याची भुमिका जाहीर केलेली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडीच्या हालचाली वाढल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्तगु सुरू झाली आहे. आज होत असलेल्या बैठकीस दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी एकत्रीत येत असून २०१९च्या निवडणूकामध्ये आघाडी करण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
राज्यात २०१९ मध्ये होत असलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये आघाडीविषयी गुप्तगु सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत. त्यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक दादरच्या टिळक भवनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेनं यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित ताकद लावण्याची तयारी केली आहे.
-------
Add new comment