सुनील केंद्रेकरांना रूजू न होण्याचे आदेश, विभागीय आयुक्तपदी भापकर कायम
औरंगाबाद : राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शनिवारी सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण बदली आदेश निघून चोवीस तास उलटत नाहीत तोच केंद्रेकर यांना रूजू होऊ नका असा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाला. त्यामुळे सोमवारी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेण्यासाठी सुनील केंद्रेकर आलेच नाहीत.
विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मुंबई येथे पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. सोमवारी त्यांना नव्या पदाचा पदभार स्वीकारायचा होता. पण सुनील केंद्रेकर औरंगाबादेत येऊ नयेत आणि भापकरच विभागीय आयुक्त म्हणून राहावेत यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह काही पुढाऱ्यांनी आपले राजकीय वजन वापरल्याची जोरदार चर्चा आहे.
परिणामी रविवारी (ता. 4) रात्री उशीरा सुनील केंद्रेकर यांना सोमवारी नवीन नियुक्तीच्या पदावर रूजू होऊ नका असा एसएमएस मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवण्यात आल्याचे बोलले जाते. शनिवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदी सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती झाल्याचे समजताच त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. औरंगाबादेतील त्यांच्या काही हितचिंतकांनी दुरध्वनीवरून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या तेव्हा देखील उद्या, सोमवारी मी साडेदहा वाजता पदभार स्वीकारणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले होते.
परंतु केंद्रेकरांना रोखून भापकर यांनाच कायम ठेवण्यासाठी रात्रीतून सुत्रे हलली आणि केंद्रेकरांना रूजू होऊ नका असे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. निवृत्तीसाठी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीच राजकारण्यांना हातीशी धरून आपली बदली रद्द करून घेतल्याची चर्चा आहे.
राजकारण्यांना केंद्रेकरांची धास्ती का ?
डॅशिंग आणि भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या सुनील केंद्रेकरांची राजकारण्यांना एवढी धास्ती का ? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. त्याचे उत्तर केंद्रेकरांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर मिळते. परभणी जिल्ह्यातील झरी-बोरी येथील रहिवासी असलेल्या सुनील केंद्रेकरांनी प्रशासकीय सेवेत आपल्या कामामुळे छाप पाडली आहे.
सातत्याने केंद्रेकर यांना निश्चित कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच बदलले जाते हा आजपर्यंतचा अनुभव. पण शासन आदेश प्रमाण मानत सुनील केंद्रेकर यांनी मिळेल त्या खात्याची जबाबदारी आजपर्यत नेटाने पार पाडली. भ्रष्टाचाराला आपल्याकडे थारा नाही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यावर त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन आणि बंद पाळण्याचे प्रकार औरंगाबाद, बीड सारख्या जिल्ह्यात सुनील केंद्रेकर यांच्या समर्थनात घडले.
विक्रीकर सहआयुक्त असतांना त्यांनी कर वसुली मोठ्या प्रमाणात वाढवली, सिडकोचे मुख्य प्रशासक आणि औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम करत असतांना काही महिन्यात त्यांनी येथील कारभार व्यवस्थित केला. महापालिकेला शिस्त लागत असतांनाच त्यांची राज्याचे कृषी आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. कृषी खात्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी गावागावात जाऊन कृषी योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना लाभ मिळतो की नाही याची पाहणी करत कामचुकार अधिकाऱ्यांना धडकी भरवली होती. क्रीडा खात्याचे सचिव म्हणून काम करत असताना या विभागातील " खेळ ' ओळखून त्यांनी गैर कारभार कारणाऱ्यांना लगाम घालण्यास सुरुवात केली होती.
पण सुनील केंद्रेकर यांची बदली रद्द झाल्याने पुन्हा एकदा राजकारण्यांची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या राज्यकर्त्यांना केंद्रेकरांचे वावडे का? असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Add new comment