कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाही-सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : (व्रत्तसेवा) वैवाहिक संबंधात दखल देणाऱ्या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. 'जर दोन वयस्क (सज्ञान) व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसऱ्याने दखल देण्याची अवश्यकता नाही. अगदी कुटुंबातील लोक असो वा समाजातील लोक, कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाही,' असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, खाप पंचायती संबंधी या याचिकेवर येत्या १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा महत्वपूर्ण निर्णय दिला. 'व्यक्तीगतरित्या, सामूहिकरित्या किंवा संघटना म्हणून कोणीही कुणाच्या विवाहामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यांना जबरदस्ती वेगळं करणं चुकीचं ठरेल,' असं सांगतानाच 'आम्ही इथे काही कथा लिहायला बसलो नाही आणि लग्न कशा पद्धतीने होतात हेही सांगायला बसलो नाही' असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
'दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण आहात?' असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीच्या वकिलाला केला. 'न्यायालयाला त्यांच्या हिशोबाने काम करू द्या. तुम्ही अशा जोडप्यांबाबत चिंता करू नका,' असं सांगतानाच 'ज्या सज्ञान जोडप्यांनी लग्न केलंय, त्यांची आम्हाला काळजी वाटतेय,' असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
'शक्ती वाहिनी' या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात याचिका दाखल करून स्वत:ला स्वयंभू न्यायालय समजणाऱ्या खाप पंचायतीसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. प्राचीन काळातील परंपरांच्या रक्षणाच्या नावावर प्रेमी युगुलांची हत्या करता येणार नाही, असं शक्ती वाहिनीने याचिकेत म्हटलं होतं. तर, आम्ही अशा प्रकारच्या हत्यांच्या विरोधात आहोत, असं खापच्या वकिलाने न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यावर न्यायालयाने 'आम्हाला खाप पंचायतीच्या अधिकारांची चिंता नाही. तर लग्न केलेल्या सज्ञान जोडप्यांची चिंता आहे. लग्न वाईट असो वा चांगलं त्यापासून आपण लांबच राहिलं पाहिजे,' असं न्यायालयाने खाप पंचायतीला बजावलं आहे.
Add new comment