लाइव न्यूज़
शरद पवारांच्या औरंगाबादेमधील सभेला अखेर पोलिसांकडून परवानगी
Beed Citizen | Updated: February 3, 2018 - 3:06pm
औरंगाबाद (वृत्तसेवा) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजच्या नियोजित सभेला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सभेला परवानगी दिली. त्यामुळे पवारांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादीने मराठवाड्यात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगता आज औरंगाबादेत होणार आहे. पण मोर्चाला परवानगी असली, तरी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास मंजुरी नसल्यामुळे औरंगाबाद महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची धावपळ सुरु होती. मात्र, काल मध्यरात्री पोलिसांनी परवानगी दिल्याने शरद पवारांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या सभेपूर्वी शनिवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आयुक्तांना निवेदन देऊन, दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सभेद्वारे हल्लाबोल यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सांगता होईल. या सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
Add new comment