शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरु करा* - *गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आंदोलनाचा इशारा
गेवराई, दि.०२ (प्रतिनिधी) ः- शासनाने दि.१ फेब्रुवारीपासून राज्यभर हमीभावाने तूर खरेदीची घोषणा करूनही गेवराई येथील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु न झाल्यामुळे गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तूर खरेदी सोमवारपर्यंत चालू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यावेळी देण्यात आला. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, खरेदीविक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गेवराई तालुक्यात यावर्षी मोठ्याप्रमाणावर तुरीचे उत्पादन झालेले आहे. तूर बाजारात आल्यानंतर व्यापार्यांनी तुरीचे भाव पाडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत तूरीला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी भर पडली आहे. तालुक्यातील ७० टक्के शेतीचे अवलंबत्व कपाशीवर असून बोंड अळीच्या प्रादुभार्वामुळे कापूस उत्पादक शेतकरी यापूर्वीच त्रस्त झालेला आहे. शासनाने घोषणा करूनही कापूस उत्पादक शेतकर्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यातच तूर उत्पादक शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही प्रत्यक्ष तूर खरेदी सुरु होत नसल्याने गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तहसिलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी तहसिलदारांची भेट घेवून या बाबत चर्चा केली. तातडीने सोमवारपर्यंत तूर खरेदी सुरु न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र स्टेट को.ऑप.मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत किंमतीने धान्य खरेदी करण्यासाठी नेमलेल्या सबएजंट संस्था सदरचे धान्य खरेदी करण्याच्या परिस्थितीत नाहीत. गेवराई तालुक्यासाठी बीड जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्था मर्या., बीड या संस्थेला सबएजंट म्हणून नेमलेले आहे. वास्तविक या संस्थेचे गेवराई तालुक्यात कोठेही कार्यालय नाही. धान्य खरेदीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व कर्मचारी या संस्थेकडे नाहीत. मागील वर्षीच्या तूर खरेदीचे शेतकर्यांचे पैसे या संस्थेने अद्याप दिलेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर तूर खरेदी घोटाळा या संस्थेने केलेला असतानाही आणि त्यांची चौकशी सुरु असताना पुन्हा याच संस्थेला काम दिल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळात बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, खरेदीविक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, संचालक श्रीराम आरगडे, झुंबर निकम, पंचायत समितीचे माजी उपसभापती आसाराम मराठे, माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, माजी नगरसेवक गोरक्षनाथ शिंदे, शहाजी मोटे, मदन लगड, समाधान मस्के, अर्जून चाळक, भारत भांडवलकर, गोवर्धन गाडे, अक्षय पवार, संजय पवार, ऋषिकेश मस्के, विक्रम खंडागळे, किशोर चौरे, पिंटू जाधव, शिवाजी काळे, सुभाष गुंजाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.९
Add new comment