लाइव न्यूज़
शालार्थ प्रणालीत तांत्रिक दोष; शिक्षकांचे जानेवारीतील वेतन होणार ऑफलाईन
Beed Citizen | Updated: February 2, 2018 - 3:05pm
बीड (प्रतिनिधी) राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन काढण्यात येते. मात्र प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये वीस दिवसांपासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ती प्रणाली सध्या बंद पडल्याने जानेवारी २०१८ चे वेतन रखडले आहे. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय विभागाने १ फेब्रुवारी रोजी परि पत्रक काढून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे माहे जानेवारी २०१८ चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
बीडसह राज्यातील लाखो शिक्षकांचे वेतन महिनाभरापासून रखडले आहे. शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये दि.१२ जानेवारी २०१८ पासुन तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ती प्रणाली बंद पडली आहे. त्यामुळेच शिक्षकांचे वेतन रखडले असून यासंदर्भात बीडसह राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा करून वेतन ऑफलाईन करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव चारूशीला चौधरी यांनी परिपत्रक काढले असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे माहे जानेवारी २०१८ चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. माहे डिसेंबर २०१७ मध्ये ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे वेतन शालार्थ मधून अदा झाले आहे. त्यांचे वेतन जानेवारी महिन्यात ऑफलाईन प्रणालीतून डिसेंबर २०१७ च्या वेतन देयकाच्या आधारे सादर करण्यात यावे. डिसेंबर २०१७ मध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतील किंवा स्वेच्छा निवृत्ती व अन्य कारणामुळे सेवेत नाहीत अशा कर्मचार्यांची नावे जानेवारीच्या वेतन देयकातून वगळण्यात यावीत. माहे डिसेंबर २०१७ मधील वेतन देयकानुसार वेतन भत्ते परिगणीत करून वेतन देयक सादर करण्यात यावे. केवळ आयकर वजाती व्यक्तीनिहाय प्रत्यक्ष तपशिलानुसार कपात करून देयकात दर्शवावा. या अटी व शर्थीवर ऑफलाईन वेतन वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
----------
Add new comment