पोरवाल दाम्पत्यांने दत्तक घेतलेल्या चिमुकलीचे शुक्रवारी नारदीय कीर्तन महोत्सवात नामकरण! खटोड सामाजिक प्रतिष्ठानकडून माता-पित्यांचा होणार सन्मान

बीड(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री कुटीर रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू झाला. मातृछत्र हरपलेल्या त्या चिमुकलीचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेल्या पित्याने जड अंतःकरणाने तिला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला आई-वडिलाचे छत्र मिळवून दिले अन् बीड येथील प्रशांत पोरवाल व त्यांच्या पत्नी सौ.बरखा प्रशांत पोरवाल यांनी चिमुकलीचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन दत्तकत्वही स्विकारले.आता या चिमुकलीचा ‘नामकरण सोहळा’ स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या आनंदात पार पडणार आहे.बीड येथे लोकसहभागातून सुरु असलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात शुक्रवार दि.2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता हा सोहळा संपन्न होत आहे. याप्रसंगी महिला-पुरुषांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नेकनूर येथील रामलिंग सांगळे यांची पत्नी मीना यांचा नेकनूर स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर हतबल झालेल्या पित्याने तिचा सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली. निरागस चिमुकलीला अनाथाश्रममध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी,जिल्हा सचिव शेख वसीम, संघटक अमजद खान, सहसंघटक शेख अय्युब आदींनी पुढाकार घेऊन चिमुकलीला प्रशांत आणि बरखा पोरवाल या दाम्पत्यांच्या माध्यमातून ‘माता-पित्याचे’ प्रेम मिळवून दिले. मुलीला थेट अनाथालयात न पाठवता तिला पालकांनी दत्तक घेण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रसंग असावा.दरम्यान यानंतर दत्तकत्व देण्याची कायदेशीर प्रक्रिया दि.20 जानेवारी 2018 रोजी पूर्ण करून चिमुकलीला पोरवाल कुटुंबाकडे अधिकृत सुपूर्द करण्यात आले आहे.

बीड शहरातील जिजामाता चौक, मसरतनगर येथे दि.25 जानेवारीपासून येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत लोकसहभागातून नारदीय कीर्तन महोत्सव आयोजीत केला गेला आहे. या महोत्सवात दुपारच्या सत्रात अयोध्याधाम येथील बालव्यास स्वामी श्री दुर्गेशजी महाराज यांची संगीतमय श्रीरामकथा तर सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील ख्यातनाम नारदीय कीर्तनकारांच्या दोन कीर्तनसेवा संपन्न होत असून या महोत्सवात शुक्रवार दि.2 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता बीड शहरातील कारंजा येथील राहिवाशी सौ.बरखा व प्रशांत पोरवाल या दाम्पत्यांने नुकत्याच दत्तक घेतलेल्या चिमुकलीचा नामकरण सोहळा श्रीरामकथेच्या व्यासपीठावर मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात त्या चिमुकलीचे ‘प्रांशी प्रशांत पोरवाल’ असे नामकरण केले जाणार आहे. याप्रसंगी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने मुलीच्या मातेचा (सौ.बरखा पोरवाल) साडी-चोळीची भेट देवून तर मुलीला पाळणा-खेळणी, सोन्याची चैन,पैंजन, पायातील चांदीचे वाळे, व भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.तसेच मुलीचे पालक प्रशांत पोरवाल यांना व ज्यांनी मोठ्या भावनेने मुलीला दत्तक देण्याचा त्या पित्याचाही पुर्ण पोशाख भेट देवून सत्कार करण्यात येणार आहे. नारदीय कीर्तन महोत्सवात संपन्न होणार्‍या या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.