पोलिसांना महाराष्ट्रात मनपसंत ठिकाणी बदली
राज्याचा गृहविभाग पोलिस कर्मचार्यांच्या सेवाशर्तीमध्ये लवकरच सुधारणा करणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली करुन घेता येणार आहे.
मुंबई : पोलिसांच्या कामाचे तास आणि ताण यामुळे अनेकदा कुटुंबाकडे लक्ष देणं कठीण जातं. त्यातच जर पोलिसांची बदली घरापासून दूर झाली असेल, तर वैयक्तिक आयुष्याचं गणित जमवणं जिकीरीचं होतं. यामुळे राज्याच्या गृहविभागाने पोलिसांना मनपसंतीच्या जिल्ह्यात बदली देण्याचा निर्णय घेतला आहे. 'दैनिक पुढारी' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
इच्छित ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी पोलिस शिपायांना अनेकदा पोलिस कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. इतकंच नाही, तर काही जण चिरीमिरी द्यावी लागत असल्याचंही सांगतात. मात्र राज्याचा गृहविभाग पोलिस कर्मचार्यांच्या सेवाशर्तीमध्ये लवकरच सुधारणा करणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली करुन घेता येणार आहे.
एखाद्या जिल्ह्यात पोलिस भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यावर इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज करतात. पोलिस भरती झाल्यानंतर हे कर्मचारी दोन ते तीन वर्षांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये बदलीसाठी अर्ज करतात. त्यासाठी कार्यालयांमध्ये खेटा घालाव्या लागतात.
बदलीच्या प्रयत्नांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तर होतोच, मात्र कुटुंबीयांपासून दुरावल्यामुळे त्यांचं मनस्वास्थ्यही बिघडू शकतं. आवश्यक वेळी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोलिस कर्मचार्यांच्या बदल्यांबाबतच्या 2011 च्या पोलिस सेवाशर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
गडचिरोलीसारख्या भागात नोकरी लागल्यानंतर पोलिस कर्मचारी बदल्यासाठी अर्ज करतात. अर्जासोबत खोटे दाखले किंवा बदली होण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी येतात. भरती झालेल्या जिल्ह्यातुन बदल्या केल्या जात असल्यामुळे पुन्हा अनुशेष निर्माण होत असल्यामुळे भरती प्रक्रिया राबवावी लागते. यात शासनाचा लाखो रुपये खर्च होतो.
पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे अधिकार उच्च अधिकार्यांना दिले आहेत. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.
Add new comment