मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला अमृत योजनेचे उदघाटन-आ.क्षीरसागर विरोधकांनाही फटकारले; गप्पा मारून आणि चमकोगिरी करून विकास होत नसतो

बीड (प्रतिनिधी) लोकहिताचे निर्णय घेवून योजना खेचून आणाव्या लागतात. पाडा-पाडीचे फोटो घेवून चमकोगिरी करून आणि नुसत्या गप्पा मारून विकास होत नसतो. नाटककं करणारी कलाकार मंडळी आता सोशल मिडीयाद्वारे पुढे येत आहे. अशा शब्दात आ.जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांना फटकारले. साठ कोटीची नवीन सुतगिरणी तीन महिन्यात उभारत असल्याचे सांगुन शहरात पायाभुत सुविधांचे जाळे विणले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १० फेब्रुवारी रोजी अमृत पेयजल योजनेचे उदघाटन होणार असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.
बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ३५ आडत गाळ्यांचे आज दुपारी आ.क्षीरसागर यांच्याहस्ते उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, व्यापारी संघटनेचे सत्यनारायण लाहोटी, ऍड.शेख शफिक, दिलीप गोरे, जगदिश काळे, विलास बडगे, अरूण नाना डाके, विकास जोगदंड आदिंची उपस्थिती होती. यावेळी आ.क्षीरसागर म्हणाले, मापाचे योग्य दाम मिळावे यासाठीच बीड बाजार समितीने कुठलेही कर्ज घेतले नाही. स्वनिधीतून प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोडायला वेळ लागत नाही परंतू जोडायला अनेक वर्ष लागतात. शेतकर्‍यांसाठी मोठे संकट उभे असतांना आपण शेतीमालाला योग्य भाव दिल्याचे त्यांनी सांगितले. शब्द दिला तर तो तडीस घेवून जाणे महत्वाचे आहे. लोकांच्या हिताची कामे करणे आवश्यक असून थोडी चमकोगिरी करण्यासाठी पाडा-पाडीचे फोटो घेण्याची घाई काही जण करतात. अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली. शहरात पायाभुत सुविधांचे जाळे विणले गेले पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू असून अमृत पेयजल योजनेचे उदघाटन दि.१० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काहींना बीडचा विकास नको आहे म्हणून जनतेची दिशाभूल केली जात आहे. नवीन साठ कोटीची सुतगिरणी तीन महिन्यात उभार राहणार असुन नुसत्या गप्पा मारून विकास होत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.