पंतप्रधानांच्या उडान योजनेअंतर्गत जवाहरची गगनभरारी
माजलगाव(वार्ताहर ) केसापुरी कॅम्प येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यावर्षीची शैक्षणिक सहल १९ ते २१ जानेवारी २०१८ या कालावधीत संपन्न झाली. सर्व सामान्यांना विमान प्रवास करता यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये प्रारंभ केलेल्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या जवाहर विद्यालयाच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेऊन आकाशातून पृथ्वीचे निरीक्षण केले. तसेच या सहलीतून पर्यावरण रक्षण व स्वछतेचा संदेश दिला.
केवळ मौजमजा न करता नांदेड, हैदराबाद आणि परळी येथील विमानतळ, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत व पर्यावरणरक्षणासाठी मूक अभिनय व "स्वच्छ हो भारत" यासारखे पथनाट्य सादर करुन लोकांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केली. सहलीतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा एकसारखा असणारा व स्वच्छतेचा संदेश देणारा गणवेश सहलीचे आकर्षक ठरला. सहलीतील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी माजलगाव ते नांदेड बसने, नांदेड ते हैदराबाद विमानाने, हैदराबाद ते परळी रेल्वेने आणि परळी ते माजलगाव बसने असा आगळा वेगळा प्रवास करुन दळणवळणाच्या विविध साधनांची माहिती घेतली. तसेच ठिकठिकाणच्या ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. हैदराबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्क, चौमोहल्ला पॅलेस, बिर्ला मंदिर, पब्लिक गार्डन, एन. टी.आर गार्डन, चारमिनार, सालार जंग, संग्रहालय, गोवळकोंडा किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेटी देऊन ऐतिहासिक माहिती घेतली तसेच विविध प्राणी व पक्षी यांचे निरीक्षण करुन ज्ञान घेतले. शेवटी परळीच्या वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सहलीचे माजलगाव मध्ये आगमन झाले.
सदरील सहलीत मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, जीवन भंडारी, बळीराम वायबसे,बजरंग बनसोडे, मतीन शेख, अनिल गावित, शामला पाटील, शुभांगी कुलकर्णी यांच्यासह ३२ विद्यार्थी असा एकूण ४० जणांचा सहभाग होता .
ही ऐतिहासिक गगनभरारी यशस्वी केल्याबद्दल नवविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस. आर.शर्मा, कार्यवाह माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.आर.डी. भिलेगावकर, संचालक ॲड.एस.बी.मुळी, ॲड.ए.एम.मोगरकर, आर.बी.देशमुख, जी.एल.जोशी, पर्यवेक्षक के.एल.मोताळे, एम.एन.मसलेकर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी व परिसरातील सर्व पालकांनी अभिनंदन केले.
Add new comment